Join us  

"कोरोना हा तर 'वन ऑफ द व्हायरसेस', त्याचा बाऊ केला जातोय"

By ऑनलाइन लोकमत | Published: July 01, 2020 10:17 AM

मला काही तज्ञांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तसं पाहिलं तर एकूण 3 ट्रिलियन्स व्हायरस आहेत, त्यामुळे कोरोना अनेकांना होऊनही गेला असेल, पण आपल्या रोगप्रतिकारशक्तीने त्यावर मात केली असेल.

मुंबई - भाजपा नेते आणि राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांनी कोरोनाबाबत बोलताना, आल्या परिस्थितीला न घाबरता सामोरं जाण्याचं आवाहन केलंय. कोरोनाचा विनाकारण बाऊ केला जातोय, स्वीडनमध्ये ज्याप्रकारे हर्ड इम्युनिटी पद्धतीचा वापर केला जात आहे. त्याचप्रमाणे भारतानेही वापर करावा, असे उदयनराजेंनी म्हटलं. तसेच, कोरोनाच्या संकटात कुणीही राजकारण करु नये, असा सल्लाही त्यांनी दिलाय. साताऱ्यात आमदार शिवेंद्रराजे भोसले यांची भेट घेतल्यानंतर पत्रकाराशी बोलताना त्यांनी आपलं मत मांडलं. 

मला काही तज्ञांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तसं पाहिलं तर एकूण 3 ट्रिलियन्स व्हायरस आहेत, त्यामुळे कोरोना अनेकांना होऊनही गेला असेल, पण आपल्या रोगप्रतिकारशक्तीने त्यावर मात केली असेल. कोरोना हा वन ऑफ द व्हायरस इज, त्यामुळे एवढा बाऊ करायचा विषय नाही. दुर्दैवाने इतरही अनेक व्हायरसमुळे लोकांचे निधन झालेलं आहेच. लोकांनी या व्हायरसला घाबरुन न जाता वस्तुस्थितीला सामोरं गेलं पाहिजे, काळजी घेतली पाहिजे, असे आवाहनही खासदार उदयनराजे भोसले यांनी केलं आहे. तसेच, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यातील ऐकमेकांवर होणाऱ्या टीकांबद्दल बोलताना, ह्यांनी त्याच्यांवर केली अन् त्यांनी ह्यांच्यावर केली, मग त्यांना जाऊन विचारा. माझा काय संबंध त्यावर बोलायचा, असे म्हणत टीकात्मक राजकारणावर बोलण्यास उदयनराजेंनी नकार दिला. 

दरम्यान, धनगर समाजाच्या आरक्षणावरून ठाकरे सरकार आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका करताना भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला कोरोना आहेत, असं वादग्रस्त विधान केले होते. गोपीचंद पडळकर यांच्या या विधानाचे पडसाद गेल्या काही दिवसांपासून राज्यभर उमटत आहे. त्यातच आता गोपीचंद पडळकरांनी केलेल्या शरद पवरांवरील विधानावरही बोलताना उदयनराजेंना मला नका विचारू असेच म्हटले. कोणी कोणाबद्दल काय बोलले हे त्यांनी मला विचारुन बोलले नाही. तसेच जे कुणी उत्तर देणार आहेत, ते मला विचारुन देणार नाहीत. माझं मत मी परखडपणे मांडत असतो. त्यामुळे गोपीचंद पडळकर आणि शरद पवार त्यांचं ते बघून घेतील, असं उदयनराजे स्पष्टच सांगितलं.  

टॅग्स :कोरोना वायरस बातम्याउदयनराजे भोसलेसातारा परिसरशरद पवार