Join us  

रिक्षाने एक हजार रुपये, तोच प्रवास बेस्टने ९५ रुपयांत

By ऑनलाइन लोकमत | Published: November 03, 2019 3:00 AM

संडे अँकर । दीपक मोदी यांचा प्रयोग; बेस्ट बसने प्रवास करण्याचे आवाहन

मुंबई : मुंबईतला प्रवास दिवसेंदिवस खर्चीक होत आहे. रिक्षा आणि टॅक्सीचा प्रवासही आता महागडा होऊ लागला असतानाच बेस्टने किमान बसभाडे पाच रुपये करण्याचा निर्णय घेतला. त्याला मुंबईकरांनी चांगला प्रतिसाद दिला, त्यामुळे बेस्टचा तोटा अजून कायम असला तरी प्रवासी संख्या मात्र वाढली आहे. बसच्या या भाडेकपातीचा नेमका काय फायदा होतो हे पाहण्यासाठी मुंबईकर बेस्ट प्रवासी दीपक मोदी यांनी एक प्रयोग केला. त्यात असे लक्षात आले की, रिक्षाने ज्या प्रवासाचे हजार रुपये होतात तोच प्रवास बेस्टने ९५ रुपयांत होत आहे.

रिक्षा आणि टॅक्सीवाल्यांच्या अरेरावीला आणि भाडे नाकारण्याच्या प्रवृत्तीला कंटाळलेल्या मोदी यांनी ‘बेस्ट’ मार्ग स्वीकारला. त्यांनी एके दिवशी प्रवास केला तो असा... ओशिवरा ते सांताक्रुझ ५ रुपये, नानावटी रुग्णालय ते अस्मिता ज्योती १५ रुपये, सांताक्रुझ ते काचपाडा १५ रुपये, नानावटी रुग्णालय ते अंधेरी ५ रुपये, सांताक्रुझ आगार ते गोरेगाव आगार १० रुपये, गोरेगाव आगार ते जनता कॉलनी १० रुपये, अस्मिता ज्योती ते सांताक्रुझ स्टेशन १५ रुपये, इर्ला ते गोरेगाव बस स्थानक १० रुपये, सांताक्रुझ ते गोरेगाव १० रुपये. या प्रवासाला रिक्षाने किमान हजारभर रुपये झाले असते, असा त्यांचा दावा आहे. त्याच प्रवासाला बेस्टच्या पूर्वीच्या दराने १६० रुपये खर्च आला असता. नवीन बसभाड्याप्रमाणे त्यांना मोजावे लागले फक्त ९५ रुपये. दीपक मोदी यांनी तिकिटाचे फोटो ट्विट केले आणि मुंबईकरांना बेस्टने प्रवास करण्याचे आवाहन केले.या प्रवासाबद्दल मोदी सांगतात, अनेकदा रिक्षा आणि टॅक्सीचालकांची मुजोरी पाहायला मिळते. भाडे नाकारले जाते. काही जण मीटरपेक्षा जास्त भाडे आकारतात. तसेच प्रवाशांना सोडणे ही त्यांच्यावर केलेली मेहेरबानी आहे अशा थाटात काही रिक्षा आणि टॅक्सी चालक वागतात. त्यामुळे मी बसने प्रवास करतो.आधी अनेक बसेस होत्या. पण आता त्यांची संख्या कमी झाली आहे. बेस्टने गाड्यांची संख्या वाढविल्यास प्रवाशांना दिलासा मिळेल आणि बेस्टला आर्थिक फायदाही होईल, असा मोदी यांना विश्वास वाटतो.विशाल पुरिया म्हणाले की...मोदी यांच्या या ट्विटवर प्रतिक्रिया देताना विशाल पुरिया म्हणाले, शुक्रवारी सायंकाळी ८ ते ८.०५ दरम्यान बेस्टच्या एकामागे एक अशा तीन बस गेल्या. त्यातील शेवटची बस पूर्णपणे रिकामी होती. मात्र त्यानंतर ४५ मिनिटे एकही बस नव्हती. त्यामुळे बेस्टने बस सोडताना कमीतकमी १० मिनिटांचे अंतर ठेवले जाईल, असे पाहावे. 

टॅग्स :मुंबईबेस्ट