Join us

गोखले पुलाची एक बाजू दिवाळीपर्यंत सुरू हाेणार! बांधकामाची पालकमंत्र्यांकडून पाहणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2023 14:36 IST

गर्डरचे सुटे भाग मुंबईत दाखल होऊ लागले असून यंदा दिवाळीपर्यंत म्हणजे नोव्हेंबर २०२३ मध्ये गोखले पुलाची एक बाजू सुरू करण्याच्या दृष्टीने कामे वेगाने केली जात आहेत, असे लोढा यांनी यावेळी स्पष्ट केले.

मुंबई : अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या गोखले पुलाच्या कामासाठी गर्डर मुंबईत दाखल झाले आहेत. या पुलाच्या बांधकामाची पाहणी मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केली. गर्डरचे सुटे भाग मुंबईत दाखल होऊ लागले असून यंदा दिवाळीपर्यंत म्हणजे नोव्हेंबर २०२३ मध्ये गोखले पुलाची एक बाजू सुरू करण्याच्या दृष्टीने कामे वेगाने केली जात आहेत, असे लोढा यांनी यावेळी स्पष्ट केले.तसेच पालकमंत्र्यांनी खड्डे भरण्याचे काम सुरू असलेल्या इर्ला मार्ग जंक्शन, व्ही. एम. मार्ग आणि एस. व्ही. मार्ग जंक्शन, सहार मार्ग जंक्शन, साकीनाका जंक्शन, कांजूरगाव इत्यादी ठिकाणी भेट दिली.  पावसाने विश्रांती घेतल्याने शक्य तितकी यंत्रणा आणि मनुष्यबळ नेमून खड्डे भरण्याची कामे वेगाने करावीत, असे निर्देश त्यांनी रस्ते विभागाच्या अधिकाऱ्यांना यावेळी दिले. याप्रसंगी अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू, उपायुक्त (पायाभूत सुविधा) उल्हास महाले यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.

-  पालिकेने यंदा पावसाळापूर्व उपाययोजना केल्यामुळे मुसळधार पाऊस पडूनही मुंबईतील सखल भागात पाणी तुंबले नाही, जनजीवन व वाहतूक सुरळीत सुरू होती. -  पावसामुळे रस्त्यांवर पडलेले खड्डे भरण्यासाठी पालिकेची यंत्रणा कार्यान्वित आहे. खड्डे भरण्याच्या कामांना वेग दिला जात आहे. -  पालिका वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचा उपयोग करीत खड्डे भरत आहे, असे लोढा यावेळी म्हणाले.

टॅग्स :मुंबई