Join us  

१ डिसेंबरपासून राष्ट्रीय महामार्गावरील टोल नाक्यावर ‘वन नेशन,वन फास्टटॅग’

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2019 8:54 PM

ऑनलाईन टोल भरण्यासाठी स्वतंत्र मार्गिका; राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचा देशभरात उपक्रम

ठळक मुद्देमोबाईलवर भरण्यासाठी ‘माय फास्टटॅग’ हा अ‍ॅपही बनविण्यात आलेला आहे. या सुविधेबरोबरच पूर्वीप्रमाणे ‘इटीसी’द्वारे रोख अथवा एटीएमद्वारे टोल वसुलीही सुरु राहणार आहे. ‘वन नेशन,वन फास्टटॅग’या तत्वानुसार राबविल्या जाणाऱ्या या अद्यावत सुविधेच्या वापरामुळे वाहनधारकांना वेळ, पैश्यांची मोठी बचत होणार

मुंबई - महामार्गावरील टोल नाक्यावर टोल भरण्यासाठी वाहनांच्या लांबवर रांगामध्ये तिष्ठत प्रतिक्षा करण्याचे टाळण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने वाहनधारकांसाठी ‘फास्टटॅग’ही सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत आहे. आगावू स्वरुपात, ऑनलाईन, कॅशलेस टोल भरणाऱ्यांना वाहनांना स्वतंत्र मार्गिकेतून कसल्याही अडथळ्याविना बाहेर पडता येणार आहे.

१ नोव्हेंबरपासून प्रायोगिक तत्वावर हा उपक्रम राबविला जात असून येत्या १ डिसेंबरपासून तो नियमित स्वरुपात कार्यान्वित केला जाणार आहे. ‘वन नेशन,वन फास्टटॅग’या तत्वानुसार राबविल्या जाणाऱ्या या अद्यावत सुविधेच्या वापरामुळे वाहनधारकांना वेळ, पैश्यांची मोठी बचत होणार असल्याचा दावा प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांकडून करण्यात आला आहे.

राष्ट्रीय महामार्गावरील वाढत्या वाहनांच्या संख्यामुळे टोल नाक्यावर अनेकवेळा रांगेत तिष्ठत रहावे लागते. त्यामुळे वाहनधारकांचा वेळ वाया जातो, ते टाळण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर ‘फास्टटॅग’ मार्गिका कार्यान्वित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याबाबत माहिती देताना प्राधीकरणाच्या विभागीय मुख्य महाव्यवस्थापक राजीव सिंग म्हणाले,‘ सर्व टोल नाक्यावर तसेच प्राधिकरणाच्या संकेतस्थळावर आणि विविध बॅँकांमध्ये ऑनलाईन रक्कम भरण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आलेली आहे. संबंधित वाहनांना ‘फास्टटॅग’ दिला जाईल, गाडीच्या पुढील दर्शनी भागावर तो लावावयाचा असून त्यांची नोंदणी टोल नाक्यावरुन पास होत असताना तेथील मशीनद्वारे स्वतंत्रपणे घेतली जाईल. त्यामुळे त्यांना कसल्याही अडथळ्याविना गाडी पुढे निघून जाईल. ही सुविधा प्रायोगिक तत्वावर एक नोव्हेंबरपासून सुरु आहे. त्यासाठीच्या कार्डसाठी अनामत स्वरुपात किमान शंभर रुपये शुल्क भरुन घेतले जात असून उद्यापासून ३० नोव्हेंबरपर्यंत मोफत नोंदणी करुन घेतली जाईल. वाहनधारकांना किमान ५०० रुपये आणि त्याहून कितीही आगावू रक्कम आगावू टोलच्या स्वरुपात भरता येणार आहे. एक डिसेंबरपासून अनामत रक्कम ५०० रुपये आकारली जाणार आहे. ही रक्कम भरण्याची सुविधा सर्व टोल नाके, तसेच प्राधीकरणाच्या संकेतस्थळ आणि सहा बॅँकांमध्ये करण्यात आलेली आहे. मोबाईलवर भरण्यासाठी ‘माय फास्टटॅग’ हा अ‍ॅपही बनविण्यात आलेला आहे. या सुविधाचा वापर करणाऱ्यांना नियमित टोल दरात अडीच टक्के सवलत मिळेल, ही रक्कम त्यांच्या कार्डवर जमा होत राहिल. त्याचप्रमाणे कार्ड सहजतेने रिचार्ज करता येणार आहेत. एक कार्ड साधारण पाच वर्षे वापरता येणार आहे. काही महिन्यानंतर राज्य सरकारकडून राज्य महामार्गावरही अशा पद्धतीने टोलची सुविधा उपलब्ध केली जाणार आहे.

या सुविधेबरोबरच पूर्वीप्रमाणे ‘इटीसी’द्वारे रोख अथवा एटीएमद्वारे टोल वसुलीही सुरु राहणार आहे. नव्या सुविधेबाबत वाहनचालकांना माहिती होण्यासाठी विविध प्रकारे जनजागृती केली जात आहे. त्यासाठी टोल नाक्यावर स्पीकर लावून कळविले जात आहे. तसेच प्रसिद्ध पत्रके, टोलच्या तिकीटावर, हेल्पलाईनवर माहिती दिली जात असल्याचे सिंग यांनी सांगितले

टॅग्स :राष्ट्रीय महामार्गमहामार्गमोबाइलमुंबई