घाटकोपर येथे नाल्यात पडून एका इसमाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2019 00:11 IST2019-11-16T00:11:24+5:302019-11-16T00:11:28+5:30
नाल्यात पडून एका इसमाचा मृत्यू झाला. एलबीएस मार्गावर महानगरपालिकेतर्फे नाल्याच्या रुंदीकरणाचे काम सुरू असताना हा अपघात घडला.

घाटकोपर येथे नाल्यात पडून एका इसमाचा मृत्यू
मुंबई : घाटकोपर पूर्वेकडील एलबीएस मार्ग येथील नाल्यात पडून एका इसमाचा मृत्यू झाला. एलबीएस मार्गावर महानगरपालिकेतर्फे नाल्याच्या रुंदीकरणाचे काम सुरू असताना हा अपघात घडला. अंकुश घाडगे असे या मृत इसमाचे नाव आहे. गुरुवारी रात्री कामानिमित्त ते घराबाहेर पडले होते. मात्र ते रात्रभर घरी परतलेच नाहीत. त्यामुळे नातेवाइकांनी तक्रार देण्यासाठी घाटकोपर पोलीस ठाण्यात धाव घेतली. या वेळी पोलिसांकडून त्यांना एक इसम नाल्यात पडल्याची माहिती मिळाली. नातेवाइकांनी इसमाचा मृतदेह पाहताच तो अंकुश घाडगे यांचा असल्याचे लक्षात आले. या मार्गावर गेली दोन वर्षे हे काम सुरू असल्याने याआधीदेखील अनेक जण या नाल्यात पडल्याच्या घटना घडल्या आहेत. प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे ही घटना घडल्याचे मृताच्या नातेवाइकांचे म्हणणे आहे.