Join us

साहित्य संमेलनातील ग्रंथ विक्रीचे शंभर स्टॉल ‘हाऊसफुल्ल’; ग्रंथ दालन नोंदणीला प्रकाशकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2024 12:53 IST

स्वप्निल कुलकर्णी -मुंबई : साहित्य संमेलनामध्ये ग्रंथदालन आकर्षणाचा केंद्रबिंदू असतो. फेब्रुवारी महिन्यात दिल्ली येथील तालकटोरा स्टेडियमध्ये २१, २२ ...

स्वप्निल कुलकर्णी -

मुंबई : साहित्य संमेलनामध्ये ग्रंथदालन आकर्षणाचा केंद्रबिंदू असतो. फेब्रुवारी महिन्यात दिल्ली येथील तालकटोरा स्टेडियमध्ये २१, २२ आणि २३ फेब्रुवारी २०२५ दरम्यान ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे. या संमेलनामध्ये ग्रंथविक्रीच्या दालनासाठी मुंबई, पुणे तसेच राज्यातील अनेक ठिकाणांहून प्रकाशकांनी उस्फूर्तपणे प्रतिसाद देत नोंदणी केली. त्यामुळे आयोजकांनी नियोजन केलेले सर्वच्या सर्व म्हणजे १०० ग्रंथ विक्रीचे स्टॉल ‘हाउसफुल्ल’ झाले आहेत.

प्रकाशकांसाठी ग्रंथ उलाढालीचा मराठी साहित्य संमेलन हा हक्काचा सोहळा असतो. त्यात ९८ वे साहित्य संमेलन दिल्लीत होणार असल्याचे जाहीर झाल्यानंतर प्रकाशक संघटनेने बहिष्काराचा पवित्रा दाखविला खरा; मात्र त्यानंतर  आयोजकांच्या ग्रंथ दालनाच्या आवाहनाला राज्यातील प्रकाशकांनी चांगला प्रतिसाद दिला. याबद्दल अधिक माहिती देताना संमेलन आयोजक ‘सरहद’ संस्थेचे प्रमुख संजय नहार यांनी सांगितले की, संमेलन दिल्लीत होणार असल्याने  ग्रंथ दालनासाठी आम्हाला जास्तीत जास्त शंभरच स्टॉल देणे शक्य होते. आमच्या आवाहनाला प्रकाशकांनी चांगला प्रतिसाद दिला. १९५४ मध्ये झालेल्या संमेलनात सहभागी झालेल्या काही प्रकाशकांनी आम्हाला  स्टॉलसाठी संपर्क साधला आहे. त्यांच्यासाठी अतिरिक्त चार स्टॉल देण्याची व्यवस्था आम्ही केली आहे, असेही त्यांनी या वेळी सांगितले.

मराठीला अभिजात दर्जा मिळाल्यानंतर नवी दिल्लीत होणारे हे पहिलेच साहित्य संमेलन आहे. नकारात्मक असे काही नाही. दिल्ली परिसरात मोठ्या संख्येने असणारा मराठी वाचकही या निमित्ताने एकत्र येईल.- घनश्याम पाटील, संपादक, ‘चपराक’ प्रकाशन, पुणे

निवास व्यवस्थेचे नियोजन अंतिम टप्प्यातप्रकाशकांच्या निवास व्यवस्थेची तयारी सुरू असून त्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. ग्रंथदालनातील प्रत्येक स्टॉलला १०*१०ची जागा आरक्षित करण्यात आली आहे. त्यासाठी  ३५०० हजार रुपये शुल्क आकारण्यात आले आहे.  

संमेलनात विचारांची देवाण-घेवाणग्रंथ चळवळ ही ग्रंथाली प्रकाशनाची धारणा आहे. प्रत्येक वेळेस ग्रंथविक्री होईलच असे नाही. नेहमीप्रमाणे याही साहित्य संमेलनात ग्रंथाली प्रकाशन सहभागी होणार आहे. संमेलनाच्या निमित्ताने वाचकांना नवीन पुस्तके मिळतात. नवीन लेखकांच्या ओळखी होतात. विचारांची देवाण-घेवाण होते. त्यातून एखादा पुस्तकाचा विषयही होऊ शकतो.     - सुदेश हिंगलासपूरकर, विश्वस्त, ‘ग्रंथाली’ प्रकाशन, मुंबई

नवी दिल्ली येथे होणाऱ्या साहित्य संमेलनाला दीड हजारहून अधिक सारस्वत तसेच पाच हजारांहून अधिक मराठी रसिक, वाचकप्रेमी येण्याची शक्यता आहे. नियोजनामध्ये कोणत्याही प्रकारची कमतरता राहणार नाही, याची आम्ही नक्कीच काळजी घेऊ. हे संमेलन अविस्मरणीय ठरेल याचा विश्वास वाटतो.    - संजय नहार, प्रमुख,     ‘सरहद’ संमेलन आयोजक संस्था

टॅग्स :मुंबई