मुंबईत एका कोरोनाबाधितांचा मृत्यू, दिवसभरात आढळले २१ रुग्ण
By संतोष आंधळे | Updated: January 6, 2024 21:08 IST2024-01-06T21:04:49+5:302024-01-06T21:08:24+5:30
राज्यात कोरोनाचे १५४ रुग्ण

मुंबईत एका कोरोनाबाधितांचा मृत्यू, दिवसभरात आढळले २१ रुग्ण
मुंबई : राज्यात काही दिवसांपासून नवीन रुग्ण सापडण्यास सुरूवात झाली आहे. त्यामध्ये शनिवारी राज्यात एकूण १५४ नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली. त्यातील २१ रुग्ण हे मुंबई शहरातील आहेत, त्यामध्ये आज एका कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला आहे. राज्यात ९११ आणि मुंबईत १४९ कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत. तसेच आज १७२ जण बरे होऊन घरी गेले असल्याची माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली आहे.
मुबंईत चेंबूर परिसरातील एका ५२ वर्षाच्या एका व्यक्तीचा कोरोनाने मृत्यू झाला. त्या व्यक्तीला सार्वजनिक रुग्णलयात गुरुवारी उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. ती व्यक्ती मद्यपानाच्या आहारी गेलेला होता. त्याला पाच दिवसापासून ताप, सर्दी आणि श्वास घेण्यासाठी त्रास होत होता. पाच जानेवारीला त्याची कोरोना चाचणी पॉजिटीव्ह आली. त्यानंतर त्याची तब्बेत खालावत गेली आणि शुक्रवारी त्याचा मृत्यू झाला.
मुंबईत जे २१ रुग्ण सापडले आहेत, आज कुणालाही रुग्णालयात दाखल करण्यात आलेले नाही. शहरात सध्याच्या घडीला कोरोनाकरिता राखीव असणाऱ्या ४२१५ बेड्सपैकी १६ बेड्सवर रुग्ण दाखल आहेत. दिवसभरात ३२० चाचण्या करण्यात आल्या. ‘जेएन १’ या व्हेरिएंटचा एकही रुग्ण आढळून आलेला नाही.
नव्याने नोंद झालेले महामुंबईतील रुग्ण
मुंबई मनपा - २१
ठाणे - २
ठाणे मनपा - १५
नवी मुंबई मनपा - १०
कल्याण-डोंबिवली मनपा -२
रायगड -६
पनवेल मनपा - २