Join us  

पालिकेकडून दीड हजार कोटींचा ‘बेस्ट’ दिलासा; आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी मदतीचा हात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 05, 2020 4:51 AM

उपक्रमास दोन हजार कोटींची तूट

मुंबई : बेस्ट उपक्रमाला सक्षम करण्यासाठी आणखी दीड हजार कोटी देण्याची तयारी पालिका प्रशासनाने आगामी आर्थिक वर्षात दाखविली आहे़ ही रक्कम विविध बँकांकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड करणे, भाडेतत्त्वावर नवीन बसगाड्या घेणे, वेतन करारानुसार देणी, आयटीएमएस प्रकल्प व दैनंदिन खर्च भागविण्यासाठी बेस्ट प्रशासन वापरू शकणार आहे.

मुंबईची दुसरी जीवनवाहिनी असलेले बेस्ट उपक्रम डबघाईला आले आहे़ या आर्थिक संकटातून बेस्टला बाहेर काढण्यासाठी पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी पुढाकार घेतला़ सन २०१९-२०२० या आर्थिक वर्षात १,९४१ कोटी रुपये अनुदान दिले आहे़ या रकमेतून बेस्ट उपक्रमाने भाडे तत्त्वावर बसगाड्या, कामगारांचे वेतन व कर्जाची काही रक्कम फेडली आहे, तरीही बेस्ट उपक्रम दोन हजार कोटींच्या तुटीत आहे.

बेस्ट उपक्रमाचा अर्थसंकल्प महापालिकेत विलीन करण्याची मागणी पूर्ण करण्यासाठी अद्याप हालचाली झालेल्या नाहीत़ मात्र, आगामी वर्षात बेस्टला आणखी दीड हजार कोटी रुपये देण्यात येणार असल्याचे, आयुक्तांनी स्पष्ट करण्यात आले आहे. सध्या २३१ बसगाड्या भाडेतत्त्वावर घेण्यात आल्या आहेत़ मार्च, २०२० पर्यंत आणखी १,२४० बसगाड्या चालविण्यात येतील़ यामुळे सध्या ३३ लाखांवर असलेली प्रवाशांची संख्या ४५ लाखांवर पोहोचू शकले, असा अंदाज आहे.

वीजनिर्मिती प्रकल्प

बेस्टचे आर्थिक स्थैर्य वाढविण्यासाठी मध्य वैतरणा धरणावरील पाण्यापासून वीजनिर्मिती प्रकल्प उभारण्यात येणार आहे़ या प्रकल्पाद्वारे २५ मेगा वॅट इतकी वीजनिर्मिती होणार आहे़ या प्रकल्पाला राज्य शासनाने मान्यता दिली आहे.

टॅग्स :मुंबई महानगरपालिकाबेस्टमुंबईमहाराष्ट्र