Join us

मुंबईमधील सर्वांत जुनी चाळ होणार नामशेष

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2019 01:25 IST

कुलाबा-वांद्रे-सीप्झ या भुयारी मेट्रो-३ प्रकल्पांतर्गत गिरगावसह काळबादेवी येथील तब्बल ५३० कुटुंबांचे तात्पुरते स्थलांतर भाड्याच्या जागेत अथवा प्राधिकरणाने दिलेल्या जागेत झाले असून, आता सर्वांत जुनी चाळ म्हणून ओळख असलेल्या क्रांतीनगरमधील ए, बी आणि सी चाळीची ओळखही पुसली जाणार आहे.

मुंबई : कुलाबा-वांद्रे-सीप्झ या भुयारी मेट्रो-३ प्रकल्पांतर्गत गिरगावसह काळबादेवी येथील तब्बल ५३० कुटुंबांचे तात्पुरते स्थलांतर भाड्याच्या जागेत अथवा प्राधिकरणाने दिलेल्या जागेत झाले असून, आता सर्वांत जुनी चाळ म्हणून ओळख असलेल्या क्रांतीनगरमधील ए, बी आणि सी चाळीची ओळखही पुसली जाणार आहे. लवकरच या चाळी जमीनदोस्त केल्या जाणार असून, रहिवाशांना तात्पुरत्या स्थलांतरासाठी घराचे भाडे मेट्रो प्राधिकरणाकडून देण्यात येत आहे.गिरगाव आणि काळबादेवी या दोन भूमिगत मेट्रो स्थानकांच्या कामाकरिता लागणाऱ्या जागेसाठी एकूण १९ इमारतींचे भूसंपादन करण्यात येत आहे. आतापर्यंत १७ इमारतींचे भूसंपादन पूर्ण झाले आहे. उर्वरित दोन इमारतींसंदर्भातील प्रक्रिया प्रगतिपथावर आहे. एकूण ५३० कुटुंबांचे तात्पुरते स्थलांतर भाड्याच्या जागेत किंवा पिंपळवाडी येथे मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने उपलब्ध करून दिलेल्या जागेत झाले आहे.या कुटुंबांचे कायमस्वरूपी पुनर्वसन गिरगाव, काळबादेवी येथेच संपादित केलेल्या जागेपैकी के २, के ३ आणि जी ३ या ब्लॉक्समध्ये विकास नियंत्रण नियमावलीतील नियम क्रमांक ३३/७ मधील आणि राज्य शासनाच्या यासंदर्भातील निर्णयानुसार करण्यात येत आहे. उर्वरित १५७ कुटुंबांचे तात्पुरते स्थलांतर प्रगतिपथावर आहे. इमारतींची कामे पूर्ण होऊन प्रकल्पग्रस्तांचे तेथे पुनर्वसन होईपर्यंत त्यांना भाडे मिळण्याची व्यवस्था केली आहे, अशी माहिती मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनकडून देण्यात आली.गिरगाव येथील क्रांतीनगरमध्ये ए, बी आणि सी अशा तीन चाळी आहेत. या तिन्ही चाळींमध्ये ११० कुटुंबे राहत आहेत. येथील शंभर कुटुंबीयांना नव्या जागेच्या भाड्यासंबंधीचे धनादेश प्राधिकरणाने दिले आहेत. एकूण कुटुंबांपैकी सहा अपात्र ठरले असून, त्यापैकी चार जणांनी म्हाडाकडे पात्रतेसाठी अपील केले आहे. त्यांनाही धनादेश देण्यात आले असून, यासंदर्भातील प्रक्रिया सुरू आहे. येथील रहिवाशांना घरे रिकामी करण्यासाठी ३१ जानेवारी ही तारीख दिली होती. त्यानंतर मुदत १५ फेब्रुवारीपर्यंत वाढविण्यात आली. मात्र अद्याप प्रक्रिया अपूर्ण असल्याने आता २८ फेब्रुवारी ही तारीख दिल्याची माहिती शिवसेनेचे गिरगाव येथील २१८ चे शाखाप्रमुख बाळा अहिरेकर यांनी दिली.मेट्रोने रहिवाशांसोबत जे करार केले आहेत; ते करार रजिस्टर करण्यात आलेले नाहीत. परिणामी, पहिल्यांदा करार रजिस्टर करण्यात यावेत, अशी मागणी रहिवाशांनी केल्याचे अहिरेकर यांनी सांगितले. महत्त्वाचे म्हणजे ४६ महिन्यांनी जेव्हा रहिवाशांचे येथे पुनर्वसन केले जाईल; तेव्हा ११० कुटुंबांना एकाच इमारतीमध्ये स्थलांतरित करण्यात यावे, अशीही मागणी रहिवाशांनी केली आहे. एकाच इमारतीत एकत्र राहून जुने स्नेहबंध जपण्याचा प्रयत्न रहिवासी करीत असले तरी या कामामुळे मुंबईतील जुनी चाळ नामशेष होणार आहे.

टॅग्स :मुंबई