परंपरा जपणारी जुनी मंडळे
By Admin | Updated: September 20, 2015 00:31 IST2015-09-20T00:31:46+5:302015-09-20T00:31:46+5:30
बाप्पाच्या मिरवणुकीतील ‘गणपती बाप्पा मोरया’ या आवाजाची जागा ‘डीजे’च्या गाण्यांनी घेतली, लेजीमाऐवजी हिंदी गाण्यांवरच्या नाचाला पसंती मिळू लागली़ आपला

परंपरा जपणारी जुनी मंडळे
बाप्पाच्या मिरवणुकीतील ‘गणपती बाप्पा मोरया’ या आवाजाची जागा ‘डीजे’च्या गाण्यांनी घेतली, लेजीमाऐवजी हिंदी गाण्यांवरच्या नाचाला पसंती मिळू लागली़ आपला बाप्पा वेगळा उठून दिसावा म्हणून बाप्पा उंचच उंच होत गेला. भक्तांच्या मनोरंजनाच्या बरोबरीने त्यांना ज्ञान मिळावे यासाठी चलतचित्र, देखाव्यांची स्पर्धा सुरू झाली. काळानुरूप गणेशोत्सव बदलत गेला. नव्या पिढीसमोर आलेल्या गणेशोत्सवात सात्विक, धार्मिक भाव कुठेतरी लुप्त होताना दिसू लागला. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी ज्या उद्देशाने गणेशोत्सव सुरू केला त्याचा विसर पडतोय का, असा प्रश्न पडू शकतो. पण गिरगावातील जुनी मंडळे ज्या सार्वजनिक मंडळांनी शंभरी पार केली आहे, ती गणेशोत्सव मंडळे अजूनही पारंपरिक पद्धतीनेच गणेशोत्सव साजरा करतात.
केशवजी नाईक चाळ गणेशोत्सव
गिरगावातील केशवजी नाईक चाळीत लोकमान्य टिळक यांनी पहिल्या सार्वजनिक गणपतीची स्थापना केली. ‘श्री सार्वजनिक गणेशोत्सव संस्था, केशवजी नाईक चाळ’ हे मंडळ गणपतीच्या आगमन आणि विसर्जन सोहळ््याची मिरवणूक पालखीतून काढतात. या मिरवणुकीत वाडीतील रहिवासीच ढोल वाजवतात. लेजीमपथकही वाडीतील रहिवाशांचे आहे. पालखी धरणारे अनवाणी येतात़ प्रत्येक पुरुष टोपी घालूनच मिरवणुकीत सहभागी होतो. गणपतीचे पावित्र्य जपण्यासाठी देव्हाऱ्यात प्रवेश करताना अध्यक्षांची परवानगी घ्यावी लागते. कीर्तन असते. एकादशीच्या दिवशी अखंड नामस्मरण केले जाते़ प्रत्येक घराला एक तासाचा वेळ दिला जातो, अशी माहिती मंडळाचे स्पर्धा समन्वयक दिनेश जोशी यांनी दिली.
कामत चाळ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ
गणेशमूर्तीची सुरक्षा आणि पावित्र्याच्या दृष्टीने हे गणेशोत्सव मंडळाची मूर्ती बंदिस्त ठिकाणी ठेवली जाते. एका विशिष्ट प्रकारच्या मखरात गणेशमूर्तीची प्राणप्रतिष्ठापना केली जाते. मंडळातील कार्यकर्तेच मंडप बांधतात. गणेशोत्सवाचा मूळ उद्देश सर्वांनी एकत्र येणे हा जोपासला जातो. नवीन पिढीतील मुलांना विविध जबाबदाऱ्या दिल्या जातात. यामुळे त्यांना घरच्या घरी विविध कौशल्ये शिकण्याची संधी मिळते. बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीच्या दिवशी मोदकाच्या आकाराची फुलाची वाडी तयार केली जाते. विसर्जन मिरवणुकीत हे एक खास आकर्षण आहे. वाडीतील मुलेच विविध कार्यक्रम बसवून सादर करतात, अशी माहिती मंडळाचे पदाधिकारी मंदार जोशी यांनी दिली.
जितेकरवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ
ठाकूद्वार येथील जितेकरवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात गणेश याग, सहस्त्रावर्तने केली जातात. वाडीतील जुने रहिवासी अनंत चतुर्दशीला आवर्जून विसर्जन मिरवणुकीत सहभागी होतात. या मंडळात पूजेसाठी एका छोट्या गणेशमूर्तीची प्राणप्रतिष्ठापना केली जाते. तर दुसरी गणेशमूर्ती विविध रूपांत साकारली जाते. गेल्या काही वर्षांपूर्वी मसाल्याचे पदार्थ, कॅडबरी, बॉल बेरिंगचे बॉल अशा विविध जीवनावश्यक वस्तूंचा वापर करून या मंडळातील कार्यकर्तेच गणेशमूर्ती साकारायचे, अशी माहिती मंडळाचे पदाधिकारी मंगेश पिटकर यांनी दिली.
धर्मैक्य संरक्षक संस्था, जगन्नाथ चाळ
या गणेशोत्सव मंडळाच्या गणपतीचे आगमन पालखीतून होते. एक वर्ष कीर्तन आणि एक वर्ष भजनाचे आयोजन केले जाते. सध्याच्या जीवनशैलीमध्ये कोणालाही वेळ नसतो. नोकरीच्या अनिश्चित वेळामुळे एकत्र भेटता येत नाही. अशावेळी गणेशोत्सवाच्या काळात सर्व मंडळी एकत्र येतात. यासाठी महाप्रसादाचे आयोजन केले जाते. मंडळातील मुलांवर विविध जबाबदाऱ्या दिल्या जातात. सध्या मंडळात कार्यरत असलेल्या कार्यकर्त्यांची ही तिसरी किंवा चौथी पिढी आहे. पूर्वापार चालत आलेली परंपरा जपली जाते. उत्सवात कोणत्याही प्रकारचा अतिरेक केलेला नाही, असे मंडळाचे पदाधिकारी सदानंद खेडेकर यांनी सांगितले.
आंबेवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ
गेल्या १०० वर्षांपासून मूर्तीत कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत. मूर्तिकाराची चौथी पिढी आमच्या बाप्पाची मूर्ती साकारते. गणेशोत्सवात आध्यात्मिक, सांस्कृतिक आणि वैज्ञानिक या तीनही गोष्टींचा समावेश आहे. लहान मुलांना, तरुणांना गणेशोत्सवाच्या माध्यमातून सामाजिक कार्याचे बाळकडू दिले जाते. गणेशयाग, सत्यनारायणाची पूजा असे धार्मिक विधी केले जातात. सजावटीसाठी जास्त खर्च केला जात नाही. कार्यकर्तेच सजावट करतात. सध्या चाळीतील काही रहिवासी वाडीत राहत नाहीत. पण त्या व्यक्तीही आवर्जून गणेशोत्सवात वाडीत येतात, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष दिलीप दळवी यांनी दिली.