Join us

मराठमोळ्या 22 वर्षीय आदित्यला गुगलची ऑफर, भला मोठ्ठा पगार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2018 20:14 IST

मराठमोळ्या आदित्यला गुगलकडून नोकरीची ऑफर देण्यात आली आहे. त्यासाठी गुगलने आदित्यला भरमसाट पगारही दिला आहे.

मुंबई - मुंबईतील 22 वर्षीय तरुणाला गुगलकडून नोकरी देण्यात आली आहे. आदित्य पालिवाल असे या युवकाचे नाव असून त्यास 1.2 कोटी रुपयांचे वार्षिक पॅकेज देण्यात आले आहे. आदित्यने बंगळुरू येथील इंटरनॅशनल इंस्टीट्यूट ऑफ इन्फॉरमेशन टेक्नॉलॉजी येथून आपली इंजिनीअरींगची पदवी घेतली आहे. त्यामुळे मुंबईचा मराठमोळा आदित्य आता न्यूयॉर्क येथील गुगलच्या कार्यालयात आर्टिफिशल इंटेलिजेंस रिसर्च विभागात काम करणार आहे. 

आदित्यला गुगलने नोकरीचा ऑफर दिली असून 16 जुलै रोजी तो कार्यालयात रुजू होत आहे. गुगलने जगभरातील 6 हजार लोकांमधून 50 जणांची निवड केली आहे. त्यामध्ये आदित्यचा नंबर लागला आहे. आदित्यने इंटरनॅशनल कॉलेजिएट प्रोग्रामिंग कन्टेस्ट (ICPC) 2017-18 च्या अंतिम फेरीत प्रवेश केला होता. कम्प्युटर लँग्वेजसंदर्भातील ही सर्वात मोठी स्पर्धा आहे. या स्पर्धेत 111 देशांमधील 3098 विद्यापीठातून 50 हजार विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. गुगलने दिलेल्या नोकरीबाबत बोलताना, मला ही ऑफर मार्च महिन्यातच मिळाली आहे. याची मी खूप वाट पाहात होतो. सध्या मी अतिशय खूप असून गुगलमध्ये मला अनेक नव्या बाबी शिकायला मिळणार आहेत, असे आदित्यने म्हटले. दरम्यान, आदित्यला प्रोग्रामिंगशिवाय ड्रायव्हिंग, फुटबॉल आणि क्रिकेट पसंत आहेत.

टॅग्स :गुगलमुंबई