‘एमडी’चा आॅक्टोपस

By Admin | Updated: January 21, 2015 01:16 IST2015-01-21T01:16:22+5:302015-01-21T01:16:22+5:30

ठाण्यातील वागळे इस्टेट भागात राहणाऱ्या सायली (नाव बदललेले) या सतरा वर्षीय मुलीचे वर्तन गेल्या काही दिवसांपासून बदलले होते. कायम विस्फारलेले डोळे आणि वेगळ्याच तंद्रीत ती वावरत असे.

'Octopus of MD | ‘एमडी’चा आॅक्टोपस

‘एमडी’चा आॅक्टोपस

ठाण्यातील वागळे इस्टेट भागात राहणाऱ्या सायली (नाव बदललेले) या सतरा वर्षीय मुलीचे वर्तन गेल्या काही दिवसांपासून बदलले होते. कायम विस्फारलेले डोळे आणि वेगळ्याच तंद्रीत ती वावरत असे. अभ्यासावरील लक्ष उडाले होते. ही बाब तिच्या पित्याच्या नजरेतून सुटली नाही. मुलीच्या ‘वेगळ्या’ वागण्याचा अंदाज घेत त्याने तिला विश्वासात घेतले तेव्हा तिने सांगितलेले वास्तव हादरवून टाकणारे होते. आपण एका विशिष्ट पावडरचे सेवन करीत असल्याचे तिने सांगितले. आपली मुलगी कसल्या तरी मादक पदार्थाच्या आहारी गेल्याचा अंदाज आल्याने पित्याने तिला पोलिसांकडे नेले. पोलिसांनी विचारपूस केली असता त्या मुलीने ‘एमडी’ अर्थात मेफेड्रॉन पावडरचे सेवन केल्याचे उघड झाले. त्यानंतर तिला ‘एमडी’ पुरवणाऱ्या प्लंबरचा शोध घेत ठाणे शहर गुन्हे अन्वेषण विभागाच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने त्याला अटक केली.

दैनंदिन धबडग्यात मुलांकडे फारसे लक्ष न देऊ शकणाऱ्या पालकांसाठी ही घटना धोक्याची घंटा ठरावी. गेल्या काही दिवसांत एमडी नावाने ओळखल्या जाणाऱ्या मादक पदार्थाचा धुडगूस सुरू आहे. महाविद्यालयीन मुले आणि मुलीही या मादक पदार्थांच्या आहारी जात आहेत. म्हणूनच पालकांनी सायलीच्या पित्याप्रमाणे जागरूक राहण्याची गरज निर्माण झाली आहे.

काय आहे एमडी...
‘एमडी’ अर्थात मेफे ड्रॉन हे फोर मिथाईलमेथ कॅथिनॉन या रसायनापासून बनलेल्या मिश्रणाची पावडर आहे. ते अ‍ॅम्फेटामाईन रसायनाशी मिळतेजुळते आहे. अमली पदार्थांमध्ये हेरॉइन, चरस, गांजा, टिटामाइन, कोडीन आणि ब्राऊनशुगर आदींचा समावेश होतो. त्यातील एमडी ही टिटामाइनसारखीच असली तरी अजूनही अमली पदार्थांमध्ये तिचा समावेश झालेला नाही. तसा समावेश होण्यासाठी राज्याच्या गृह विभागाने केंद्राकडे अलीकडेच प्रस्ताव पाठविलेला आहे.
काय होते ‘एमडी’मुळे?
सुरुवातीला सहज म्हणून जरी ‘एमडी’ची चव घेतली तर कायमचे तिच्या आहारी जाण्याची भीती असते. ती सेवन करणाऱ्याला किमान अर्धा ते एक तास वेगळाच उसना ‘उत्साह’ जाणवतो. झोप आणि भूकही लागत नाही. वजन कमी होते. हाडेही कमकुवत होतात. बऱ्याचदा शाळकरी किंवा कॉलेजच्या विद्यार्थ्यांना ‘अरे घे रे जरा, उत्साह वाढेल,’ असा आग्रह करीत तलफ लावली जाण्याची शक्यता असते. ‘एमडी’चा अंमल आणि डोस जादा होऊन आजारी पडून रुग्ण अवघ्या चार ते पाच महिन्यांतच दगावतो. त्यामुळे एमडीचे सेवन अगदी जिवावरही बेतण्याची भीती असल्याचे एका डॉक्टरने सांगितले.

आता ठाणे, मुंब्य्रात कारवाई...
च्यापूर्वी ‘एमडी’ पावडरचा ‘एनडीपीएस’मध्ये समावेश नसल्यामुळे पोलिसांकडून कारवाई होत नव्हती. ज्या भागात ती अधिक प्रमाणात विक्री केली जाते त्या मुंब्य्रातील पालक आणि सामाजिक संस्थांनी याविरोधात निदर्शने करून कारवाईची मागणी केल्यानंतर ठाणे पोलिसांकडून तरी कारवाई होऊ लागली. त्यात एकेकाळचा तस्कर करीम लाला याचा भाचाही पकडला गेला.

ठाण्याच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने गेल्या वर्षी केलेल्या २३ पैकी आठ कारवाया या ‘एमडी’च्या होत्या. त्यातील एक चरस आणि तीन गांजा विक्रीच्या आहेत. ‘एमडी’ हा अमली पदार्थाचाच प्रकार असला तरी तो विकणाऱ्यावर केवळ भारतीय दंड संहितेच्या कलम ३२८ नुसार गुन्हा दाखल होतो. म्हणजेच अपराध करण्याच्या इराद्याने विष वगैरेंनी दुखापत करणे तसेच गुंगीकारकाचा प्रयोग इतकीच त्याची कायदेशीर व्याख्या असली तरी ‘एनडीपीएस’ (नार्कोटिक्स ड्रग्ज अ‍ॅण्ड सायकोट्रॉपिक अ‍ॅक्ट) इतकी तीव्रता त्यात नाही.

‘एनडीपीएस’ची कलमे लागू केली तर संबंधित आरोपीला जामीन मिळत नाही. किमान १० ते १५ वर्षांच्या शिक्षेचीही तरतूद आहे. याउलट ३२८ च्या कलमान्वये जामीनही मिळून आरोपी दोन-तीन महिन्यांत कोठडीतून बाहेरही पडतो. त्यामुळेच ‘एमडी’ विक्रेत्यावरही ‘एनडीपीएस’ अंतर्गत कारवाईची गरज आहे. अशा पदार्थांच्या आहारी गेलेल्याने किंवा एखाद्याला विक्रीचा प्रयत्न झाल्यास त्याने केलेल्या तक्रारीवरून न्यायालयातही आरोपीला शिक्षा होण्यास प्रबळता मिळते, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

पालकांनी काय करावे...
च्सायलीच्या पालकांप्रमाणेच इतरांनीही पाल्यांबाबत तसेच शिक्षकांनीही जागरूक असणे गरजेचे आहे. मुलांमध्ये तसे व्यसन आढळल्यास त्याला त्यातून बाहेर काढण्यासाठी चांगल्या मानसोपचार तज्ज्ञांकडे तसेच डॉक्टरांकडे समुपदेशनासाठी नेणे गरजेचे आहे. पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकालाही याबाबतची माहिती दिल्यास पुढील अनर्थ टळू शकतो. तर मुलांनी त्यातही विशेषत: मुलींनी कोणाकडूनही चॉकलेट अथवा ड्रिंक्स घेण्याचे टाळावे. एखाद्या पार्टीत अशी पावडर दिली जाण्याची किंवा सरबतामध्ये मिसळण्याची शक्यता असते.

Web Title: 'Octopus of MD

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.