Join us  

अडथळ्यांच्या ब्रेकमुळे मेट्रो मार्गिकांची धाव लांबणीवर; महत्त्वाकांक्षी कामे रखडली

By ऑनलाइन लोकमत | Published: September 09, 2020 1:24 AM

प्रकल्प मुदतीत पूर्ण करणे अशक्य

- संदीप शिंदे मुंबई : मुंबई महानगर क्षेत्रातील ३७० किमी. लांबीपैकी सध्या काम सुरू असलेल्या मेट्रो मार्गिका पुढील पाच वर्षांत तर उर्वरित २०३१ पर्यंत सुरू करण्याचे उद्दिष्ट आहे. मात्र, वादग्रस्त कंत्राटदार, कारशेडच्या मार्गातील विघ्न, मार्ग बदलाची मागणी, कोरोनामुळे ढासळलेले आर्थिक नियोजन, मजुरांची वानवा, पीपीपी तत्त्वावरील प्रतिसादाबाबत साशंकता अशा अनेक कारणांमुळे निर्धारित मुदतीत एकही मेट्रो धावणार नाही हे जवळपास स्पष्ट झाले आहे.

२०१४ साली कार्यान्वित झालेली घाटकोपर-अंधेरी-वर्सोवा ही मेट्रो तोट्यात असून रिलायन्सच्या विनंतीनंतर ती मार्गिका आपल्याकडे घेण्याच्या हालचाली एमएमआरडीएने सुरू केल्या आहेत. डी.एन. नगर, दहिसर आणि दहिसर ते अंधेरी या मेट्रो २ अ आणि ७ या मार्गावर आॅक्टोबर २०२० पासून मेट्रो धावेल, असे सांगितले जात होते. मात्र, कोरोना संकट, कारशेडसाठीच्या जागेचा विलंब आणि मेट्रो सातच्या वादग्रस्त कंत्राटदारात बदल यामुळे मुहूर्त किमान वर्षभर लांबणीवर पडला. मानखुर्द-वांद्रे-डी.एन. नगर या मेट्रो (दोन ब) मार्गिकेच्या कामात दिरंगाई करणाऱ्या कंत्राटदारांना एमएमआरडीएने बाहेरचा रस्ता दाखवला. त्याला सात महिने लोटल्यानंतरही नव्या कंत्राटदाराची नियुक्ती केली नाही. त्यामुळे रखडलेले ९६ टक्के काम आॅक्टोबर २०२२ या निर्धारित वेळेत पूर्ण करणे अशक्य आहे.

तीन आणि चारच्या मार्गात कारशेडचे विघ्न

एमएमआरसीएलच्या अखत्यारीतील कुलाबा-सीप्झ मेट्रो तीनचे आरे कॉलनी येथील कारशेड पर्यावरण संवर्धनाच्या मुद्द्यावर जवळपास रद्द झाले आहे. नव्या जागेचा अद्याप पत्ता नाही. त्यामुळे डिसेंबर २०२१ पर्यंत पहिला आणि जून २०२२ पर्यंत दुसरा टप्पा सुरू करण्याचे स्वप्नही धुळीला मिळाले आहे. वडाळा, ठाणे, कासरवडवली-गायमुख या मेट्रो चार आणि चार अच्या कारशेडसाठी मोगरपाडा येथील जागा देण्यास स्थानिकांचा विरोध आहे. या मार्गावरही आॅक्टोबर २०२२ पर्यंत मेट्रो धावण्याची आशा धूसर आहे.

मार्ग बदलाच्या हालचाली

ठाणे-भिवंडी-कल्याण ही मेट्रो ५ आॅक्टोबर २०२४ पर्यंत सुरू करण्याचे प्रस्तावित आहे. मात्र, स्थानिक लोकप्रतिनिधींच्या आग्रहामुळे भिवंडी, कल्याण परिसरातील मार्ग बदलण्याची प्रक्रिया सुरू करावी लागली आहे. तर, कल्याण-तळोजा मेट्रोचा (१२) मार्गच चुकीचा असून तो बदलण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी आग्रही आहेत.

प्रकल्पांचे आस्ते कदम

स्वामी समर्थनगर विक्रोळी (मेट्रो ६) या मार्गिकेचे काम जेमतेम १२ टक्के झाले आहे. मेट्रो ९ आणि सातचा विस्तारित मार्ग ७ अ दहिसर-मीरा-भार्इंदर-अंधेरी-विमानतळ येथेही प्राथमिक कामे सुरू आहेत. गायमुख-शिवाजी चौक (मार्ग १०), वडाळा छत्रपती शिवाजी टर्मिनस (११) या मार्गिकांना प्राथमिक मंजुरी मिळाली असली तरी कामांनी वेग पकडलेला नाही.

टॅग्स :मेट्रोमुंबई