पुस्तकाच्या पलीकडच्या विश्वाचे निरीक्षण करा
By Admin | Updated: August 11, 2015 04:37 IST2015-08-11T04:37:03+5:302015-08-11T04:37:03+5:30
आपण सर्वांना समान संधी देऊ शकत नाही. पण सर्वांना समान संधी मिळत असते, असे ठाम मत प्रसिद्ध उद्योजक इन्फोसिसचे सहसंस्थापक नारायण मूर्ती यांनी मांडले.

पुस्तकाच्या पलीकडच्या विश्वाचे निरीक्षण करा
मुंबई : आपण सर्वांना समान संधी देऊ शकत नाही. पण सर्वांना समान संधी मिळत असते, असे ठाम मत प्रसिद्ध उद्योजक इन्फोसिसचे सहसंस्थापक नारायण मूर्ती यांनी मांडले. आयुष्यात मोठे व्हायचे असेल तर पुस्तकाच्या पलीकडे असणाऱ्या विश्वाचे निरीक्षण करा आणि त्यातून शिका, असा सल्लाही त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना दिला.
झेविअर्स महाविद्यालयात ‘मल्हार’ महोत्सवाचा भाग म्हणून नारायण मूर्ती यांनी सोमवारी विद्यार्थ्यांशी मनमोकळपणे संवाद साधला. ते म्हणाले, भारतातील बेरोजगारीच्या प्रमुख समस्येचे उच्चाटन करणारी भक्कम व्यवस्था निर्माण केली पाहिजे. त्यासाठी कोणत्याही यंत्रणेची वाट पाहत बसण्यापेक्षा तरुण पिढीने कृतिशील पुढाकार घेतला पाहिजे.
याप्रसंगी मूर्ती यांनी आपला जीवनपट विद्यार्थ्यांसमोर उलगडला. शिवाय, विचारांची चाकोरीबद्धता मोडून त्यापलीकडे तरुणाईने विचार करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. भारतातील शिक्षण व्यवस्थेत बदल केले पाहिजेत, असे सांगून मूर्ती यांनी शैक्षणिक अभ्यासक्रमाद्वारे जागतिक घडामोडींचे ज्ञानही विद्यार्थ्यांनी दिले पाहिजे, यावर भर दिला. मूर्ती यांच्या या भाषणाला विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. (प्रतिनिधी)