Join us  

'सेवा हमी कायद्याचं पालन हेच लक्ष्य', खातेवाटपानंतर बच्चू कडूंनी सांगितलं टार्गेट 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 05, 2020 10:32 AM

राज्यमंत्री बच्चू कडू यांनी खातेवाटप होताच प्रतिक्रिया देताना,

मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर सुमारे आठवडाभाराने नव्या मंत्र्यांच्या खातेवाटपाची यादी जाहीर झाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिफारस केलेल्या मंत्रिमंडळाच्या खातेवाटपास राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मान्यता दिली आहे. त्यामध्ये, राज्यमंत्री म्हणून बच्चू कडू यांना महत्वाच्या खात्यांची जबाबदारी देण्यात आली आहे. मला दिलेल्या सर्व खात्यांचं सोनं करू, असे बच्चू कडूंनी म्हटलं आहे.

राज्यमंत्री बच्चू कडू यांनी खातेवाटप होताच प्रतिक्रिया देताना, मला दिलेल्या विभागात मजबुतीने काम करणार असल्याचं स्पष्ट केलंय. दिलेल्या खात्यांचं आम्ही सोनं करू, महिला बालकल्याण, इतर मागास वर्ग आणि शालेय शिक्षण विभागात मी मजबुतीनं काम करेल. माझ्याकडील चारही खात्यांमध्ये सेवा हमी कायद्यात पालन करण्याचं महत्त्वाचं काम मी करेन. सेवा हमी कायद्याचं पालन झाल्यास तक्रारी अजिबात येणार नाही, असे बच्चू कडू यांनी म्हटले. तसेच, धरणं झाली पण शेतकऱ्यांच्या शेतात पाणी पोहोचलं नाही. त्यामुळे जलसंपदा मंत्री झाल्यामुळे मी शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पाणी पोहोचवणार आहे, असे बच्चू कडू यांनी खातेवाटपानंतर पहिली प्रतिकिया देताना सांगितले.

दरम्यान, मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर राज्यमंत्री बच्चू कडू अमरावतीत दाखल झाले होते. त्यानंतर त्यांनी दर्यापूर येथील तहसील कार्यलयाला भेट दिली आणि तक्रारीसंदर्भात बैठक घेतली. यावेळी संजय गांधी निराधार योजनेत हलगर्जीपणा आणि अनेक नागरिकांना रेशन कार्ड न दिल्याने संबंधीत दोन नायब तहसीलदारांवर बच्चू कडू यांनी कारवाई केली. त्यामध्ये संजय गांधी निराधार योजनेत हलगर्जीपणा केल्यामुळे निरीक्षक सपना भोवते आणि नागरिकांना रेशन कार्ड न दिल्याने नायब तहसीलदार (पुरवठा) प्रमोद काळे यांच्यावरही निलंबनाची कारवाई करण्याचे आदेश कडू यांनी दिले होते. त्यामुळे, आपल्या कामातून ते सर्वसामान्यांच्या हिताचे काम करणार असल्याचे स्पष्ट संकेत देत आहेत. 

टॅग्स :बच्चू कडूमुंबईशिक्षण क्षेत्रमंत्री