ओबामांमुळे द्राक्षे आंबट
By Admin | Updated: February 6, 2015 01:46 IST2015-02-06T01:46:38+5:302015-02-06T01:46:38+5:30
द्राक्षांवरील गारपिटीच्या अस्मानी संकटातून द्राक्ष उत्पादक अजून सावरला नसताना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांची भारत भेट शेतकऱ्यांसाठी आणखी एक संकट ठरले.

ओबामांमुळे द्राक्षे आंबट
संदीप प्रधान - मुंबई
द्राक्षांवरील गारपिटीच्या अस्मानी संकटातून द्राक्ष उत्पादक अजून सावरला नसताना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांची भारत भेट शेतकऱ्यांसाठी आणखी एक संकट ठरले. ओबामा यांच्या दौऱ्याच्या काळात तब्बल पाच दिवस वाघा बॉर्डर बंद ठेवल्याने पाकिस्तान व बांगलादेशकडे जाणारी द्राक्षे तशीच पडून राहिल्याने सडून गेली.
हंगामात नाशिकहून दररोज २५ ट्रक द्राक्षे पाकिस्तान व बांगलादेशकडे जातात. बॉर्डर बंद असल्याने येथून निघालेले ट्रक बॉर्डरवरच थांबले. त्यामुळे द्राक्षे पाकिस्तान व बांगलादेशात पोहोचायला तब्बल १० दिवस लागल्याने बराच साठा खराब झाला. याचा परिणाम असा झाला की प्रति किलो ४५ रुपयांनी उत्पादकांकडून द्राक्ष खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांनी दर निम्म्याने पाडले. शिवाय आठवडाभर माल उचललाच नाही.
हे संकट एवढ्यावरच थांबले नाही. नेमक्या त्याचवेळी रशियात सुरू असलेल्या उलथापालथींमुळे रुबल घसरला आणि त्याचाही फटका द्राक्ष उत्पादकांना बसला. यामुळे व्यापाऱ्यांनी १० रुपये कमी दराने शेतकऱ्यांना पैसे दिले. (प्रतिनिधी)
नाशिकमधून हंगामात ब्रिटन, युरोपीय राष्ट्रे तसेच पाकिस्तान व बांगलादेश येथे ४ हजार कंटेनर द्राक्षे निर्यात केली जातात. अगोदरच गारपिटीमुळे द्राक्ष उत्पादकांची अवस्था बिकट झाली असताना ओबामांच्या भारतभेटीने आमचे नुकसान झाले आहे.
- बाळासाहेब क्षीरसागर
द्राक्ष बागायतदार संघाचे
माजी अध्यक्ष व द्राक्ष उत्पादक