पोषक आहारात भ्रष्टाचार
By Admin | Updated: June 26, 2015 23:04 IST2015-06-26T23:04:21+5:302015-06-26T23:04:21+5:30
पालघरच्या एकात्मिक बालविकास प्रकल्प कार्यालयांतर्गत बालकांना देण्यात येणारा शालेय पोषण आहार वाटप करताना पटसंख्यापेक्षा जास्त बालकांची

पोषक आहारात भ्रष्टाचार
पालघर : पालघरच्या एकात्मिक बालविकास प्रकल्प कार्यालयांतर्गत बालकांना देण्यात येणारा शालेय पोषण आहार वाटप करताना पटसंख्यापेक्षा जास्त बालकांची २७ जूनपर्यंत हजेरीमध्ये नोंद दाखवून खाऊच्या पैशाचा अपहार करण्यात आल्याची तक्रार आगवण ग्रामपंचायतीचे सदस्य कुशल रविंद्र पाटील यांनी केली आहे.
एकात्मिक बालविकास प्रकल्पाअंतर्गत गरोदर माता व ० ते ६ वर्षे वयोगटातील बालकांमध्ये आढळून येणारे कुपोषणाचे प्रमाण रोखण्यासाठी वाटप करण्यात येणाऱ्या सकस आहारा (टीएचआर) ची अनेक पाकीटे सातपाटी-शिरगावच्या समुद्र किनाऱ्यावर फेकून देण्यात आल्याचे वृत्त लोकमतने प्रसिद्ध केल्यानंतर आता पालघर-बोईसर रस्त्यावरील आगवन पाडा या वस्तीमधील अंगणवाडीला माजी सरपंच रविंद्र पाटील, विद्यमान ग्रा. प. सदस्य रविंद्र माच्छी, वासुदेव माच्छी यांनी आज भेट दिली असता या अंगणवाडीच्या रजिस्टरवर विद्यार्थ्यांची संख्या वाढवून २७ जून पर्यंतची हजेरी नोंदविल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. या अंगणवाडीची पटसंख्या ३० विद्यार्थ्यांची असतांना ती ७६ इतकी असल्याचे दाखविण्यात आली आहे तर आज हजेरीपटात उपस्थित विद्यार्थ्यांची संख्या ५४ इतकी दाखविण्यात आल्याचे ग्रा. प. सदस्याच्या पहाणी अहवालामध्ये नमूद केल्याचे त्यांनी सांगितले. या यासंदर्भात अंगणवाडीची अतिरीक्त जबाबदारी असलेल्या दिप्ती दिपक पाटील यांच्याशी पत्रकारांनी संपर्क साधला असता आगवणच्या अंगणवाडीत आपण आठवड्यातून दोनच दिवस जात असल्याचे सांगून विद्यार्थ्यांच्या हजेरी पत्रकावर आगाऊ हजेरी कुणी लिहून ठेवली या बाबत आपणास कुठलीही कल्पना नसल्याचे त्यांनी सांगितले व आपण या जून महिन्यापासूनच पदभार स्वीकारल्याचे त्यांनी सांगितले. या अंगणवाडीच्या पूर्वीच्या सेविका निलीमा पिंपळे या एप्रिल महिन्यात निवृत्त झाल्या असल्या तरी अजूनही त्या अधूनमधून अंगणवाडीमध्ये येत असल्याचे आपल्या मदतनीसांनी सांगितल्याचेही त्यांनी सांगितले. या अंगणवाडीतील विद्यार्थ्यांच्या पोषण आहार वाटपाची जबाबदारी ही जागृती बचत गटाकडे असताना पूर्वीच्या सेविका मदतनीसाच्या सहाय्याने स्वत: पोषण आहार बनवून मुलाना वाटप करीत असत अशी माहिती आहे. या अंगणवाडीचे मागील सहा महिन्याचे बिल सुमारे ५० हजाराच्या आसपास असून यामध्ये विद्यार्थ्यांची संख्या फुगवून पैशाचा मोठा अपहार झाल्याची शक्यता आहे. विकास प्रकल्प कार्यालयाचे अधिकारी पी. एस. वालेकर यांच्याशी संपर्क साधला असता या बाबत तक्रार आल्याचे मान्य करून स्वत: या अंगणवाडीला भेट देऊन खातरजमा करून दोषींवर कारवाई करणार असल्याचे त्यांनी लोकमतला सांगितले. असाच प्रकार अन्य ठिकाणी देखील घडला असण्याची दाट शक्यता आहे.