Join us

हक्काचा डबा, पण धडधाकटांचा अड्डा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2025 13:21 IST

सातत्याने ठोस कारवाईची गरज, सुरक्षित प्रवासाची हमी द्या; दिव्यांग प्रवाशांची अपेक्षा

महेश कोले मुंबई : मध्य व पश्चिम रेल्वेच्या लोकलमधील दिव्यांग आणि कर्करोगाच्या रुग्णांसाठी राखीव असलेल्या डब्यांमध्ये धडधाकट प्रवाशांचीच संख्या अधिक असल्याचे वास्तव पाहायला मिळते. त्यामुळे त्यांच्यासाठी राखीव असलेल्या जागेत दिव्यांगच 'घुसखोर' ठरल्याचे चित्र दिसत आहे.

अनेक अपंग नागरिक सुशिक्षित झाले असून, नोकरी करून स्वतःचा उदरनिर्वाह करतात. त्यामुळे त्यांना हक्काचा सुरक्षित प्रवास मिळणे अत्यावश्यक आहे. त्यासाठी 'आरपीएफ'कडून घुसखोर प्रवाशांवर ठोस व सातत्यपूर्ण कारवाई होणे गरजेचे असल्याचे दिव्यांग प्रवाशांचे म्हणणे आहे.

मुंबईत लोकलने दररोज हजारो दिव्यांग प्रवास करतात. त्यांची परिस्थिती जाणून घेण्यासाठी 'लोकमत'च्या प्रतिनिधीने शनिवारी दिव्यांग डब्यातून प्रवास केला. लोकलच्या सहाव्या आणि नवव्या डब्यात त्यांच्यासाठी दोन कंपार्टमेंट राखीव आहेत. असे असताना या डब्यांमध्ये महिला प्रवाशांसह इतर धडधाकट प्रवासीच जास्त असल्याचे पाहायला मिळाले. मात्र, गर्दीमुळे या डब्यात शिरणाऱ्यांना आवरणे दिव्यांगांसह 'आरपीएफ'लाही कठीण होते. अनेक प्रवाशांना 'आरपीएफ' जवान खाली उतरवताना दिसले. परंतु, त्यांच्यापैकी महिला प्रवाशांवर आणि ड्युटीवर नसलेल्या पोलिसांवर कारवाई होत नसल्याचे दिव्यांग प्रवाशांनी सांगितले.

पोलिसांचीही घुसखोरी; मुख्यमंत्र्यांना ई-मेल 

दिव्यांगांच्या डब्यातून रेल्वे पोलिसांची घुसखोरी होत असून, त्यांच्यावर कारवाई होत नसल्याची खंत निर्धार विकलांग विकास सामाजिक संघाचे अध्यक्ष नितीन गायकवाड यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ई-मेलद्वारे व्यक्त केली आहे. पोलिस आणि धडधाकट प्रवासी अपंगांना शिवीगाळ करतात आणि मारहाण करतात. गायकवाड यांनाही अनेकवेळा मारहाण करण्यात आली. परंतु, 'जीआरपी'ने कोणतीही कारवाई केली नाही.

हेल्पलाइन, व्हॉट्सअॅप ग्रुपही निरर्थक

रेल्वेची हेल्पलाइन आणि व्हॉट्सअॅप ग्रुपही काहीच उपयोगाचे नाहीत. तक्रार केल्यावर कोणतीही कारवाई होत नसल्याचे निर्धार विकलांग विकास सामाजिक संघाचे अध्यक्ष नितीन गायकवाड मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या ई-मेलमध्ये म्हटले आहे. त्यामुळे याबाबत मुख्यमंत्र्यांनी दखल घेऊन मदत करावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.

'फटका गँग'मुळे २०१३ मध्ये मी अपंग झालो. पण कामासाठी डोंबिवलीहून रोज ठाण्यापर्यंत प्रवास करावा लागतो. आम्हाला आमच्यासाठी राखीव असलेल्या डब्यात चढता येत नाही. दिव्यांग आता सुशिक्षित झाले असून, भीक मागण्याऐवजी नोकरी करत आहेत. रेल्वेतून सुरक्षित प्रवासासाठी ठोस उपाययोजना गरजेची आहे- सचिन गरुड, दिव्यांग प्रवासी

टॅग्स :मुंबईमुंबई लोकल