Join us

मोठी बातमी! मुंबईत नगरसेवकांची संख्या वाढली; २३६ वार्डाला निवडणूक आयोगाची मान्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2022 19:16 IST

मुंबई महापालिकेत २२७ प्रभाग आहेत, मात्र मागील काही वर्षांमध्ये उपनगरांत लोकसंख्या वाढली आहे. त्यामुळे राज्य मंत्रिमंडळाने नऊ प्रभाग वाढविण्याचा निर्णय घेतला.

मुंबई - राज्य मंत्रिमंडळाने नऊ प्रभागांची संख्या वाढविल्याने मुंबई महापालिकेने २३६ प्रभागांचे सीमांकान करून सुधारित मसुदा राज्य निवडणूक आयोगाला सादर केला होता. या आराखड्याला राज्य निवडणूक आयोगाने मान्यता दिली आहे. यावर निवडणूक आयोगाने हरकती व सूचना मागविण्यास पालिका प्रशासनाला सुचित केले आहे. त्यानुसार यादी प्रसिद्ध करून प्रभाग रचनेबाबत हरकती व  मागविल्या जाणार आहेत.

मुंबई महापालिकेत २२७ प्रभाग आहेत, मात्र मागील काही वर्षांमध्ये उपनगरांत लोकसंख्या वाढली आहे. त्यामुळे राज्य मंत्रिमंडळाने नऊ प्रभाग वाढविण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार २३६ प्रभागांचा सुधारित आराखडा तयार राज्य निवडणूक आयोगाकडे गेल्या आठवड्यात सादर करण्यात आला होता. हा आराखडा मंजूर करीत राज्य निवडणूक आयोगाने महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांना २३६ प्रभागांच्या सीमा आणि जनतेकडून हरकती व सूचना मागवण्याची सूचना केली आहे.

त्यानुसार १ फेब्रुवारी रोजी याबाबतची अधिसूचना काढून यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. त्याच दिवशी संकेतस्थळावर २३६ प्रभागांची यादी प्रसिद्ध करून जनतेकडून हरकती व सूचना मागविल्या जाणार आहेत. १ ते १४ फेब्रुवारी या कालावधीत मागविलेल्या हरकती व सूचना १६ फेब्रुवारी रोजी राज्य निवडणूक विभागाला सादर केल्या जाणार आहेत. त्यानंतर २६ फेब्रुवारीपर्यंत हरकती व सुचनांवर अंतिम सुनावणी होईल. तसेच २ मार्च रोजी शिफारशीसह विवरणपत्र राज्य निवडणूक आयोगाला सादर करावे, असे सूचित करण्यात आले आहे.

टॅग्स :निवडणूकमुंबई महानगरपालिका