Join us  

राज्यातील कोरोना रुग्णसंख्या 3 लाखांवर, मुंबईनेही 1 लाख केले पार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2020 8:50 PM

राज्यात सलग तिसऱ्या दिवशी आठ हजारांहून अधिक नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. दिवसभरात ८  हजार ३४८ बाधितांची नोंद झाली असून १४४ मृत्यू झाले आहेत.

मुंबई – राज्यात कोरोनाचा पहिला रुग्ण मार्च महिन्यात आढळला होता. त्यानंतर कोरोनावर उपाययोजना करत राज्य शासन व पालिका प्रशासनाने कंबर कसली आहे. मात्र तरीही चार महिन्यानंतरही कोरोनावर मात करण्याची लढाई सुरु आहे. राज्यात शनिवारी कोरोना रुग्णांच्या संख्येने तीन लाख रुग्णांचा टप्पा ओलांडला आहे, तर मुंबईतही एक लाखांहून अधिक कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे.

राज्यात सलग तिसऱ्या दिवशी आठ हजारांहून अधिक नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. दिवसभरात ८  हजार ३४८ बाधितांची नोंद झाली असून १४४ मृत्यू झाले आहेत. राज्यात एकूण रुग्णसंख्या ३ लाख  ९३७ असून मृतांचा आकडा ११ हजार ५९६ झाला आहे. सध्या राज्यात १ लाख २३ हजार सक्रिय रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५५.०५ टक्के झाले असून मृत्यूदर ३.८५ टक्के झाला आहे. राज्यात शनिवारी नोंद झालेल्या १४४ मृत्यूंमध्ये मुंबई ६५ , ठाणे १, नवी मुंबई मनपा १, कल्याण डोंबिवली मनपा ६, उल्हासनगर मनपा १, भिंवडी निजामपूर मनपा ३, वसई विरार मनपा ८, रायगड १, नाशिक २,  नाशिक मनपा २, धुळे मनपा १, जळगाव १, पुणे ९ , पुणे मनपा १६, पिंपरी चिंचवड मनपा ७, सोलापूर १, सोलापूर मनपा ४, रत्नागिरी ५, औरंगाबाद मनपा ४, लातूर १, उस्मानाबाद १, अमरावती १, अमरावती मनपा १, बुलढाणा २ या रुग्णांचा समावेश आहे.

दिवसभरात ५ हजार ३०६ रुग्ण बरे होऊन घरी गेले , तर आजपर्यंत एकूण १ लाख ६५ हजार ६६३ जण कोविडमुक्त झाले आहेत. आजपर्यंत तपासण्यात आळेल्या १५ लाख २२ हजार ५६४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १९.७६ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ७ लाख ४० हजार ८८४ व्यक्ती घरगुती अलगीकरणात आहेत. तर ४५ हजार ५५२ व्यक्ती संस्थात्मक अलगीकरणात आहेत. 

टॅग्स :कोरोना वायरस बातम्यामुंबईआरोग्यहॉस्पिटल