आता महिला प्रवाशांचीही ‘दबंगगिरी’

By Admin | Updated: November 9, 2016 05:39 IST2016-11-09T05:39:58+5:302016-11-09T05:39:58+5:30

डहाणू-चर्चगेट लोकलमध्ये भार्इंदर आणि वसई-विरार परिसरातील प्रवाशांना प्रवास करण्यास पुरुष प्रवाशांकडून विरोध होत असतानाच, त्यांच्याच सुरात सूर मिसळून आता महिलांनी विरोध सुरू केला आहे.

Now women passengers 'Dabanggiri' | आता महिला प्रवाशांचीही ‘दबंगगिरी’

आता महिला प्रवाशांचीही ‘दबंगगिरी’

शशी करपे, वसई
डहाणू-चर्चगेट लोकलमध्ये भार्इंदर आणि वसई-विरार परिसरातील प्रवाशांना प्रवास करण्यास पुरुष प्रवाशांकडून विरोध होत असतानाच, त्यांच्याच सुरात सूर मिसळून आता महिलांनी विरोध सुरू केला आहे. मंगळवारी सकाळी डहाणूहून चर्चगेटकडे जाणाऱ्या लोकलच्या महिला डब्यात विरारमधील महिला प्रवाशांनी प्रवेश
करू नये म्हणून दरवाजेच आतून बंद करण्यात आले. शेवटी पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर विरारच्या प्रवाशांना डब्यात प्रवेश मिळाला. मात्र, दरम्यानच्या काळात झालेल्या गोंधळामुळे लोकलचा १० मिनिटे खोळंबा झाला.
डहाणूहून चर्चगेटकडे जाणारी लोकल मंगळवारी सकाळी ८.३७ वाजता विरार स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक ४वर आली. या लोकलच्या महिलांच्या डब्याचे दरवाजे आतून बंद करण्यात आले होते. प्लॅटफॉर्मवरील महिला प्रवाशांनी वारंवार विनवण्या करूनही आतील महिलांनी दरवाजे उघडले तर नाहीतच, पण डब्यात चढू पाहणाऱ्या प्रवाशांनाच शिव्या घातल्या. पुरुष प्रवाशांनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करूनही हे दरवाजे उघडले गेले नाहीत. त्यामुळे पुरुष डब्यातून साखळी ओढून लोकल थांबवण्यात आली व रेल्वे पोलिसांना पाचारण करण्यात आले.
रेल्वे पोलीस आणि आरपीएफच्या जवानांनी आतील महिलांना डब्याचा दरवाजा उघडण्यास भाग पाडले. त्यानंतरच विरारमधील महिला प्रवाशांना डब्यात प्रवेश करता आला. हा गोंधळ तब्बल दहा मिनिटे सुुरू राहिल्याने या लोकलसह इतरही लोकलला उशीर झाला.
कंट्रोल रूममधून कॉल आल्यानंतर आरपीएफचे जवान ताबडतोब घटनास्थळी गेले आणि त्यांनी प्रवाशांना काबूत आणले. या प्रकरणी अद्याप कुणीही तक्रार केलेली नाही. मात्र,दबंगगिरी करणाऱ्या प्रवाशांवर आरपीएफकडून कारवाई करण्यात येईल, अशी माहिती आरपीएफचे पोलीस सब इन्स्पेक्टर एस. एस. यादव यांनी दिली.
या आधीही हाणामारी
डहाणू लोकलमध्ये प्रवास करण्यावरून पुरुष डब्यात वसई-विरार आणि भार्इंदरमधील प्रवाशांना विरोध झाला होता व त्यावरून हाणामारीच्या घटना घडल्या होत्या. त्यानंतर आरपीएफने १९ आॅक्टोबरच्या रात्री विरारला दबंगगिरी करणाऱ्या डहाणू, पालघर परिसरातील १४ प्रवाशांना लोकलमधून पकडून त्यांच्यावर कारवाई केली होती. ही घटना ताजी असतानाच आता महिला प्रवाशांकडून दबंगगिरी केली जात असल्याने डहाणू-चर्चगेट लोकलमधील वाद चिघळण्याची भीती व्यक्त होत आहे.

Web Title: Now women passengers 'Dabanggiri'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.