Join us  

आता लस कृती आराखड्याची; काेराेना संसर्गाचे संकट परतवून लावण्यासाठी सज्ज

By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2021 1:21 AM

पालिका प्रशासन : काेराेना संसर्गाचे संकट परतवून लावण्यासाठी सज्ज

मुंबई : मुंबईत कोरोना पुन्हा हातपाय पसरत असल्याने पुढील आठ ते १५ दिवस महत्त्वाचे आहेत. त्यामुळे कोरोनाला रोखण्यासाठी महापालिकेने कृती आराखडा तयार केला आहे. त्यानुसार चाचण्यांचे प्रमाण वाढविणे, रुग्णांचा अहवाल २४ तासांमध्ये मिळावा तसेच खासगी रुग्णालयातील ८० टक्के खाटा कोविड रुग्णांसाठी सज्ज ठेवणे, खासगी रुग्णालय आणि जम्बो काेविड केंद्राचा आढावा घेण्यात येणार आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सोमवारी झालेल्या नियोजन व आढावा बैठकीत आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी हे आदेश दिले..

गेल्या दोन आठवड्यात मुंबईतील रुग्णसंख्या तिपटीने वाढली. यामुळे कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी पुन्हा लॉकडाऊन होण्याची वेळ मुंबईवर आली आहे. मात्र, हे संकट परतवून लावण्यासाठी पालिका आणि खासगी प्रयोगशाळांचे प्रतिनिधी, पालिका आणि खासगी दवाखान्यांच्या प्रतिनिधींची बैठक आयुक्तांनी नुकतीच घेतली.  दवाखान्यांमध्ये कोविडसदृश्य लक्षणे असलेली व्यक्ती आल्यास त्याची काेराेनासंदर्भातील चाचणी तातडीने  करुन संबंधित व्यक्तीचा पूर्ण पत्ता पिनकोडसह नोंदवून घ्यावा, जेणेकरून रुग्णाला शोधण्यास त्रास होणार नाही, असे निर्देश आयुक्तांनी दिले.

खासगी रुग्णालयात ८० टक्के खाटा राखीव

आयुक्तांनी खासगी रुग्णालय आणि जम्बो कोविड केंद्रांचाही आढावा घेतला. खासगी रुग्णालयातील ८० टक्के खाटा कोविडच्या रुग्णांसाठी सज्ज ठेवण्याच्या सूचना केल्या आहेत. मार्च २०२०मध्ये मुंबईत कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर सप्टेंबर महिन्यात कोविड रुग्णांची संख्या वाढली. त्याकाळात अवलंबलेल्या उपाययोजना पुन्हा राबविण्यात येणार आहेत.

५० व्यक्तींची मर्यादा

विवाह सोहळा, धार्मिक किंवा कौटुंबिक कार्यक्रम आदींमध्ये जास्तीत जास्त ५० व्यक्तिंना सहभागी होण्यास परवानगी आहे. सर्व चित्रपटगृह, नाट्यगृह, उपहारगृह आणि खासगी कार्यालयांत एकूण क्षमतेच्या ५० टक्के व्यक्तींना परवानगी असेल. नियम मोडल्यास संबंधित व्यक्तींना दंड व आस्थापने, व्यवस्थापन यांच्यावरही कायदेशीर कारवाई केली जाईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले.

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसमुंबई महानगरपालिका