आता जादा पाणीपट्टीबाबत करू शकतात पालिकेकडे थेट तक्रार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:11 IST2021-09-02T04:11:27+5:302021-09-02T04:11:27+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : पाणीपट्टी जादा येत असल्यास ग्राहकांना आता मुंबई महापालिकेकडे तक्रार करता येणार आहे. यासाठी पाणीपट्टीच्या ...

आता जादा पाणीपट्टीबाबत करू शकतात पालिकेकडे थेट तक्रार
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : पाणीपट्टी जादा येत असल्यास ग्राहकांना आता मुंबई महापालिकेकडे तक्रार करता येणार आहे. यासाठी पाणीपट्टीच्या थकीत रकमेपैकी ५० टक्के बिल भरण्याची अट शिथिल करण्यात आली आहे. त्यामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
मुंबईकरांना दररोज ३८५० दशलक्ष लीटर पाणीपुरवठा केला जात आहे. यासाठी महापालिकेला प्रति एक हजार लीटरवर २४ रुपये खर्च करावे लागत आहेत. तर प्रतिव्यक्ती ९० लीटर पाणीपुरवठा दररोज केला जात आहे. ग्राहकांना जलमापकाच्या आधारे पाणीपट्टी आकारण्यात येत असते. परंतु, जादा बिल आल्यास त्याबाबत तक्रार करण्यापूर्वी थकीत रकमेच्या ५० टक्के रक्कम पालिकेकडे जमा करावी लागत असल्याने ग्राहकांची गैरसोय होत होती.
अनेकवेळा पालिकेतील तांत्रिक त्रुटींमुळे ग्राहकांना हजाराचे बिल लाखोंमध्ये आल्याचे प्रकार घडले आहेत. याबाबत पालिकेकडे तक्रार करायची असल्यास बिलाची निम्मी रक्कम भरावी लागते. परिणामी, काही ग्राहक पाणीपट्टी भरणे टाळतात, अशी बाब समोर आली आहे. त्यामुळे थकीत ५० टक्के रक्कम भरण्याची अट रद्द करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. त्यासाठी पालिका अधिनियमात सुधारणा करण्यात येणार आहे.