Join us
Daily Top 2Weekly Top 5

आता बोरीवलीपुढेही लोकल, एक्स्प्रेसला स्वतंत्र मार्गिका, पाच-सहा मार्गिकेचे काम १८% पूर्ण; वाहतूक क्षमता वाढवण्यास होणार मदत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2025 13:10 IST

Mumbai Suburban Railway : पश्चिम रेल्वेच्या बोरीवली आणि विरार स्टेशनदरम्यान पाचवी आणि सहावी मार्गिका उभारण्यात येत आहे. या प्रकल्पाचे काम १८ टक्के पूर्ण झाले आहे. या प्रकल्पामुळे बोरिवलीच्या पुढेही लोकल आणि मेल-एक्स्प्रेससाठी स्वतंत्र मार्गिका मिळणार असल्याने प्रवासी वाहतूक कार्यक्षमता वाढवण्यास मदत मिळणार आहे.

मुंबई - पश्चिम रेल्वेच्या बोरीवली आणि विरार स्टेशनदरम्यान पाचवी आणि सहावी मार्गिका उभारण्यात येत आहे. या प्रकल्पाचे काम १८ टक्के पूर्ण झाले आहे. या प्रकल्पामुळे बोरिवलीच्या पुढेही लोकल आणि मेल-एक्स्प्रेससाठी स्वतंत्र मार्गिका मिळणार असल्याने प्रवासी वाहतूक कार्यक्षमता वाढवण्यास मदत मिळणार आहे. उर्वरित जमीन अधिग्रहणाचे कामदेखील जलदगतीने करण्यात येत असून, या टप्प्याचे काम 'एमयूटीपी ३ अ' प्रकल्पांतर्गत सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

पश्चिम रेल्वेमार्फत पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेचे काम सुरू आहे. सध्या खार आणि कांदिवलीदरम्यान सहावी मार्गिका तयार आहे, तर विस्तारीकरण वर्षअखेरपर्यंत बोरिवलीपर्यंत करण्यात येणार आहे. प्रकल्पाच्या पुढच्या टप्प्यातील प्रकल्पाचे काम मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन (एमआरव्हीसी) मार्फत सुरू आहे. पश्चिम रेल्वे मार्गावर बोरिवली आणि विरारदरम्यान २६ किमीची पाचवी आणि सहावी मार्गिका तयार करण्यात येत आहे.

खाडीवर उभारणार दोन पूलबोरिवली-विरार प्रकल्पासाठी २ हजार १८४ कोटी रुपये खर्च येणार आहे. तो राज्य आणि केंद्र शासन उचलणार. पश्चिम उपनगरीय रेल्वे मार्गावरील गर्दी कमी करण्यासाठी आणि उपनगरी व लांब पल्ल्याच्या वाहतुकीचे विभाजन करण्यासाठी हा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.प्रकल्पामध्ये भाईंदर आणि २ नायगाव स्थानकांदरम्यानच्या खाडीवर दोन महत्त्वाच्या पुलांची उभारणी करण्यात येणार आहे. वसई खाडीवर हे पूल असणार आहेत. हे काम ३६ महिन्यांत पूर्ण होणे अपेक्षित असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

जमीन अधिग्रहण प्रगतिपथावरखासगी जमीन मिळविण्याच्या प्रक्रियेत १.८१ हेक्टरपैकी १.४० हेक्टरचा ताबा आधीच मिळाला आहे, तर उर्वरित जमीन कायदेशीर प्रक्रियेत आहे.०.६७ हेक्टर सरकारी जमीन प्रकल्पासाठी उपलब्ध करून दिली आहे. सुमारे १३.६२ हेक्टर खारफुटी क्षेत्राचे संपादनही सुरू असून टप्प्याटप्याने मंजुरी मिळत आहे.यासह पर्यावरण मंत्रालयाकडून टप्पा-१ आणि टप्पा-२ वन मंजुरी मिळाली आहे, तसेच मुंबई उच्च न्यायालयाने खारफुटी क्षेत्रात काम करण्यास परवानगी दिल्याने प्रकल्पातील महत्त्वाचा अडथळा दूर झाला आहे. 

संरचनात्मक कामांना वेगदहिसर, मीरा रोड, भाईंदर, नायगाव आणि वसई रोड परिसरात रेल्वेच्या विद्यमान संरचनांचे स्थलांतर सुरू आहे. रिले रूम, कार्यालये आणि कर्मचारी निवासस्थाने उभारण्याचे काम वेगाने सुरू आहे. दहिसर, नायगाव व नालासोपारा रेल्वे स्थानकांवर पादचारी पूल आणि प्लॅटफॉर्म विस्ताराचे कामही प्रगतिपथावर आहे. मातीकामासाठी दहिसर-वसई रोड विभागात स्वतंत्र निविदा मागवण्यात आल्या आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Borivali Beyond: Local, Express Trains Get Separate Lines; Project 18% Done

Web Summary : Mumbai's Borivali-Virar rail project, 18% complete, will add separate lines for local and express trains, boosting capacity. Work includes bridge construction and land acquisition. Expected completion: 36 months.
टॅग्स :मुंबई उपनगरी रेल्वेपश्चिम रेल्वे