मुंबई - पश्चिम रेल्वेने प्रवाशांची सोय लक्षात घेऊन ‘पोर्टर ऑन कॉल’ ही सुविधा सुरू केली आहे. भारतीय रेल्वेमध्ये प्रथमच हमालांची सेवा ऑनलाइन पद्धतीने सुरू करण्यात आली आहे. ही सेवा सध्या ज्या स्थानकांवर हमाल उपलब्ध नाहीत अशाच स्थानकांची उपलब्ध करून देण्यात आली असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
रेल्वेने प्रवास करताना अवजड सामान वाहून नेणाऱ्या प्रवाशांना मदत मिळण्यासाठी पश्चिम रेल्वेने अनोखा उपक्रम राबवला आहे. या सेवेंतर्गत प्रवासी ऑनलाइन पोर्टर म्हणजेच हमाल बुकिंग करू शकतात. बुकिंगसाठी वेबसाइट फोन नंबर किंवा क्युआर कोड स्कॅन करण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. तसेच प्रवाशांना त्यांच्या बुकिंगचे कन्फर्मेशन व्हॉट्सॲपद्वारे मिळणार असून, ज्यामध्ये हमालांचे नाव आणि मोबाइल नंबर असणार आहे. सध्या ही सेवा वापी आणि वलसाड स्थानकावर सुरू करण्यात आली असून, लवकरच ती वसई रोड स्थानकावरही सुरू करण्यात येणार आहे. हमालीच्या ऑनलाइन सुविधेच्या उपक्रमामुळे पश्चिम रेल्वेला तिकीट विरक्ती व्यतिरिक्त महसूल वाढविण्यास मदत होणार आहे. या सेवेसाठीचे कंत्राट एका एजन्सीला दिले जाणार असून तीच्या माध्यमातून ज्या स्थानकांवर हमालीची सुविधा उपलब्ध नाही अशा स्थानकावर ती उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच हमालीचे दर हेदेखील इतर हमालीच्या दरांप्रमाणेच ठेवण्यात आले असून, त्यामुळे अनावश्यक वाटाघाटीच्या समस्या टाळणार आहेत.
परवानाधारक सहाय्यक नसलेल्या स्थानकांवर प्रवाशांना पोर्टरची आवश्यकता पूर्ण करण्यासाठी पश्चिम रेल्वेच्या मुंबई मध्य विभागाने हा अभिनव उपक्रम सुरू केला आहे. यांचे दर परवानाधारक सहायकप्रमाणेच असणार आहेत. यासाठी सेवादार कंपनीला त्याबद्दल करारबद्ध करण्यात आले आहे.- विनीत अभिषेक, मुख्य जनसंपर्क अधिकारी, पश्चिम रेल्वे