Join us  

आता, पेट्रोलही 105 वर थांबेल, रोहिणी खडसेंचा भाजपला खोचक टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: July 03, 2021 12:30 PM

महाराष्ट्रात पेट्रोलने चक्क 105 चा आकडा गाठला आहे. त्यावरुन, रोहिणी खडसेंनी भाजपला लक्ष्य केलं आहे.  

ठळक मुद्देपेट्रोल दरवाढीनंतर दिल्लीत आज पेट्रोल 99.16 रुपयांवर पोहोचले आहे. तर, दिल्लीत डिझेल 89.18 रुपये प्रती लीटर विकले जात आहे. तुलनेनं मुंबईत पेट्रोलचे दर 105 रुपयांवर पोहोचले आहेत

मुंबई - लॉकडाऊनमुळे अगोदरच त्रस्त झालेल्या देशातील जनतेला महागाईला सामोरे जावे लागत आहे. इंधनाचे दर सातत्याने वाढतच असल्याने त्याचा परिणाम थैट दैनंदिन वापरातील आवश्यक वस्तूंच्या किंमतींवरही होताना दिसत आहे. पेट्रोलने शंभरील पार केल्यानंतर देशभरातून मोदी सरकारचा निषेध नोंदविण्यात आला. मात्र, आता पेट्रोलने चक्क 105 चा आकडा गाठला आहे. त्यावरुन, रोहिणी खडसेंनी भाजपला लक्ष्य केलं आहे.  

पेट्रोल दरवाढीनंतर दिल्लीत आज पेट्रोल 99.16 रुपयांवर पोहोचले आहे. तर, दिल्लीत डिझेल 89.18 रुपये प्रती लीटर विकले जात आहे. तुलनेनं मुंबईत पेट्रोलचे दर 105 रुपयांवर पोहोचले आहेत. भाजपाने विधानसभा निवडणुकीत 105 विजयी आमदारांचे संख्याबळ गाठले होते. राज्यातील सर्वात मोठा पक्ष भाजपा ठरला होता. मात्र, महाविकास आघाडी अस्तित्वात आल्याने भाजपला सत्तेपासून दूर राहावे लागले. 

राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांनी पेट्रोल दरवाढीवरुन भाजपला खोचक टोला लगावला आहे. अरे पेट्रोल पण पोहोचले की 105, बहुधा आता तिथंच थांबेल ते.. असे ट्विट रोहिणी खडसे यांनी केले आहे. भाजपा आमदारांच्या संख्याबळाएवढा पेट्रोलचा प्रति लिटरचा दर आहे, त्यावरुन रोहिणी खडसेंनी भाजपला टोला लगावला आहे. दरम्यान, रोहिणी खडसे नेहमीच आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन भाजपवर टीका करतात. यापूर्वीही ओबीसी आंदोलनावरुन त्यांनी भाजपवर टीका केली होती. 

ओबीसींच्या आरक्षणावरुनही फडणवीसांना लक्ष्य केलं

ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द होण्यास ठाकरे सरकारच जबाबदार असल्याची टीका भाजपा नेत्यांकडून करण्यात येत आहे. त्यावरून, देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारला थेट इशारा दिला आहे. ओबीसी समाजाचा विश्वासघात राज्य सरकारकडून होत आहे, असे म्हणत भाजपाकडून तीव्र आंदोलनाचा इशाराच देण्यात आला होता. त्यावरुन रोहिणी खडसेंनी भाजपला टोला लगावला होता. भाजपाला ओबीसींचा कळवळा कधीपासून यायला लागला? ओबीसी नेत्यांचे नेतृत्व संपविताना हा कळवळा कुठे गेला होता?. आता गळा काढण्यात अर्थ नाही, असे ट्विट रोहिणी खडसेंनी केलं होतं.   

पेट्रोल डिझेलेचे महत्वाच्या शहरांतील दर -शहर         पेट्रोल         डीजलनवी दिल्ली -    99.16        89.18मुंबई -          105.25        96.72कोलकाता    -     98.99        92.03चेन्नई -        100.15        93.72बेंगळुरू -        102.46        94.54

पेट्रोलियम प्रोडक्ट्सवरील टॅक्सने केंद्राची बंपर कमाई -

आरटीआयमधून समोर आलेल्या माहितीनुसार, कोरोना काळात पेट्रोलियम प्रोडक्ट्सवरील कस्टम आणि एक्साइज ड्यूटीच्या माध्यमाने केंद्र सरकारच्या कमाईत 56 टक्क्यांहूनही अधिकची वाढ झाली आहे. तसेच, इनडायरेक्ट टॅक्सच्या माध्यमाने सरकारची कमाई जवळपास 2.88 लाख कोटी रुपये एवढी झाली आहे.

2020-21 मध्ये पेट्रोलियम प्रोडक्ट्सवरील इंपोर्टवर 37 हजार 806 कोटी रुपयांची कस्टम ड्यूटी वसूल केली गेली. तर सेंट्रल एक्साइज ड्यूटीच्या माध्यमाने 4.13 लाख कोटी रुपयांची कमाई झाली. तर पेट्रोलियम पदार्थांवरील इंपोर्टवर सीमा शुल्क म्हणून 46 हजार कोटी रुपयांची कमाई झाली आहे.

दोन महिन्यात 8.76 रुपयांनी महागल पेट्रोल - 

राजधानी दिल्लीत 1 मेरोजी 90.40 रुपये प्रति लिटरवर असलेले पेट्रोल आता 99.16 रुपये प्रती लीटरवर पोहोचले आहे. म्हणजेच गेल्या 60 दिवसांत पेट्रोलचे दर तब्बल 8.76 रुपये प्रति लिटरने वाढले आहेत. याच प्रकारे राजधानीत डिझेलचे दरही गेल्या दोन महिन्यात 8.45 रुपये प्रति लिटरने वाढून 89.18 रुपयांवर पोहोचले आहेत.

टॅग्स :पेट्रोलभाजपामुंबई