Join us
Daily Top 2Weekly Top 5

आता कॅन्सरतज्ज्ञ परिचारिका कोर्स; पोस्ट बेसिक डिप्लोमा इन ऑन्कॉलॉजी नर्सिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2025 06:30 IST

जिल्हा रुग्णालयांत कॅन्सरसाठी डे केअर सेंटर सुरू करण्याची घोषणा केंद्रीय अर्थसंकल्पात करण्यात आली होती. आता सरकारी रुग्णालयेही कॅन्सर उपचारांना प्राधान्य देणार आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : कॅन्सर रुग्णांची संख्या वाढत असल्याने जिल्हा रुग्णालयांत उपचारासाठी डे केअर सेंटर सुरू केली जाणार आहेत. तेथे कर्करोग तज्ज्ञ परिचारिकांची मोठ्या प्रमाणात गरज भासणार आहे. त्यासाठी आरोग्य विभाग सज्ज झाला आहे. त्यानुसार कामा रुग्णालय परिसरातील परिचर्या प्रशिक्षण केंद्रात प्रथमच पोस्ट बेसिक डिप्लोमा इन ऑन्कॉलॉजी नर्सिंग हा एक वर्षाचा अभ्यासक्रम चालू करण्यात येणार आहे. त्यामुळे कर्करोगतज्ज्ञ नर्स तयार होतील.  

जिल्हा रुग्णालयांत कॅन्सरसाठी डे केअर सेंटर सुरू करण्याची घोषणा केंद्रीय अर्थसंकल्पात करण्यात आली होती. आता सरकारी रुग्णालयेही कॅन्सर उपचारांना प्राधान्य देणार आहेत.

वाढते कर्करुग्ण चिंताजनक टाटा मेमोरियल सेंटरचे संचालकांनी दिलेल्या माहितीनुसार,  दरवर्षी देशात १५ लाख कर्करुग्ण आढळतात. त्यापैकी सुमारे आठ लाख रुग्णांचा मृत्यू होतो. येत्या काही वर्षांत रुग्णांचे प्रमाण २१ लाखांपर्यंत जाण्याची भीती आहे.

नव्या अभ्यासक्रमाची निकडसध्या आरोग्य विभागात एकही कर्करोगतज्ज्ञ परिचारिका नाही. त्यामुळे आरोग्य विभाग पोस्ट बेसिक डिप्लोमा इन ऑन्कॉलॉजी नर्सिंग हा एक वर्षाचा अभ्यासक्रम सुरू करणार आहे, अशी माहिती संबंधित सूत्रांनी दिली. 

अभ्यासक्रम निकष... हा अभ्यासक्रम एक वर्षाचा असेल. त्याची प्रवेश क्षमता २० विद्यार्थी असेल. प्रवेशासाठी उमेदवाराने जीएनएम किंवा बी.एस्सी. उत्तीर्ण  नोंदणीकृत अधिपरिचारिका असणे आवश्यक आहे. या अभ्यासक्रमाच्या पहिल्या टप्प्यात आरोग्य विभागातील अधिपरिचारिकांना संस्थास्तरावर प्रवेश देऊन प्रशिक्षित केले जाणार आहे. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यासाठी आवश्यकतेनुसार इतर उमेदवारांना सीईटीमार्फत प्रवेश देण्याबाबत विचार सुरू आहे. 

काय शिकवणार ?कर्करोगतज्ज्ञ परिचारिका हा स्वतंत्र अभ्यासक्रम आहे. त्यात कॅन्सर रुग्णांची शुश्रुषा कशा पद्धतीने करावी?, त्यासाठीचे प्रोटोकॉल यासह विविध गोष्टी शिकविल्या जातील. सध्या हा अभ्यासक्रम काही खासगी परिचर्या प्रशिक्षण केंद्रात सुरू आहे. त्यांची मदत घेण्यात येणार आहे.   

टॅग्स :कर्करोग