मुंबईकरांसाठी आता जलवाहतुकीचे जाळे
By Admin | Updated: November 8, 2016 05:12 IST2016-11-08T05:12:27+5:302016-11-08T05:12:27+5:30
मुंबई व परिसरातील सागर किनाऱ्याचा वापर करून जलवाहतुकीचे जाळे येत्या तीन वर्षांत उभारण्यात येईल, अशी घोषणा

मुंबईकरांसाठी आता जलवाहतुकीचे जाळे
मुंबई : मुंबई व परिसरातील सागर किनाऱ्याचा वापर करून जलवाहतुकीचे जाळे येत्या तीन वर्षांत उभारण्यात येईल, अशी घोषणा केंद्रीय भूपृष्ठ व जलवाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केली.
भाऊचा धक्का येथे मुंबई पोर्ट ट्रस्टच्या माध्यमातून हाती घेण्यात आलेल्या आॅइल जेट्टी, प्रवासी टर्मिनल आणि बंकरिंग टर्मिनलच्या कामाचा भूमिपूजन तसेच कोनशिला अनावरण सोहळा फडणवीस आणि गडकरी यांच्या हस्ते करण्यात आला. खा. अरविंद सावंत, खा. राहुल शेवाळे, आ. आशिष शेलार, मुंबई पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष संजय भाटिया आदी या वेळी उपस्थित होते.
जवाहर द्वीप येथे (जेडी ५) आॅइल जेट्टी - देशातील सर्वात मोठी जेट्टी. इंधनांनी भरलेले भव्य टँकर्स या जेट्टीवर थेट येणार. हा प्रकल्प मार्च २०१९ मध्ये पूर्ण करण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी या वेळी जाहीर केले.
बंकरिंग टर्मिनल म्हणजे जहाजांना इंधन भरण्याचे ठिकाण. देशातील असे पहिले टर्मिनल जवाहर द्वीप येथे उभारण्यात येत आहे. फेब्रुवारी २०१७ मध्ये ते पूर्ण करणार. तसेच नेरूळ ते मांडवा आणि मांडवा ते भाऊचा धक्का अशा त्रिकोणात रोरो सेवा सुरू केली जाईल. नेरूळ ते मांडवा अंतर अवघ्या १७ मिनिटांत तर भाऊचा धक्का ते मांडवा अंतर १५ मिनिटांत पार करता येणार. प्रवाशांसोबतच बस, कार यांचीदेखील रोरोमधून वाहतूक करणार. त्याची उभारणी मार्च २०१८ पर्यंत करण्यात येईल. त्यामुळे रस्तेवाहतुकीवरील ताण कमी होईल, असे ते म्हणाले.
समुद्रात सोडल्या जाणाऱ्या
पाण्यावर करणार प्रक्रिया
मुंबईच्या समुद्रात सोडल्या जाणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रि या करून त्याचा पुनर्वापर करणे आणि प्रक्रिया केलेले सांडपाणी समुद्रात सोडण्यासाठी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून अशा प्रकारचे प्रक्रिया प्रकल्प सुरू करण्यात येणार आहेत. त्यामुळे येत्या तीन ते चार वर्षांत स्वच्छ नितळ समुद्र हे स्वप्न प्रत्यक्षात येईल, असे मुख्यमंत्री या वेळी म्हणाले.
एलिफंटा लेण्यांत निवास व्यवस्था
प्रसिद्ध एलिफंटा लेण्यांमध्ये २४ तास वीज पुरविण्याचे काम लवकरच सुरू केले जाईल. त्यानंतर तेथे पर्यटकांच्या निवासाची व्यवस्था केली जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले. (विशेष प्रतिनिधी)