Join us  

लोकल सुरू झाल्याने आता पुढील दोन आठवडे महत्त्वाचे, महापालिकेची यंत्रणा झाली सतर्क

By ऑनलाइन लोकमत | Published: February 03, 2021 8:03 AM

Mumbai Suburban Railway : कोरोनाचा संसर्ग मुंबईत आता पूर्णपणे आटोक्यात आला असला, तरी लोकल सेवा सर्वांसाठी सुरू झाल्यामुळे महापालिका यंत्रणा सतर्क आहे.

मुंबई : कोरोनाचा संसर्ग मुंबईत आता पूर्णपणे आटोक्यात आला असला, तरी लोकल सेवा सर्वांसाठी सुरू झाल्यामुळे महापालिका यंत्रणा सतर्क आहे. आता दररोज लाखो मुंबईकर रेल्वेतून प्रवास करणार असल्याने पुढील दोन आठवडे महत्त्वाचे ठरणार आहेत. त्यामुळे या काळात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे का? याकडे महापालिकेचे बारीक लक्ष असणार आहे.मुंबईतील रुग्ण वाढीचा दैनंदिन सरासरी दर ०.१२ टक्क्यांवर आला आहे. रुग्ण संख्या दुप्पट होण्याचा कालावधी ५६४ दिवसांचा आहे. मार्च २०२० ते ३१ जानेवारी २०२१ पर्यंत तीन लाख नऊ हजार २९७ बाधित रुग्ण आढळून आले आहेत, तर आतापर्यंत ९४ टक्के कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच सध्या पाच हजार ६५६ सक्रिय रुग्ण उपचार घेत आहेत. मात्र, मार्च २०२० पासून बंद ठेवण्यात आलेली लोकल सेवा सोमवारपासून सर्वांसाठी सुरू करण्यात आली आहे. यामुळे लाखोंच्या संख्येने प्रवासी दररोज प्रवास करणार असल्याने कोरोनाचा संसर्ग वाढण्याचा धोका कायम आहे.रेल्वे प्रवासासाठी तीन वेळा निश्चित करण्यात आल्या आहेत. तसेच रेल्वे स्थानकांवर गर्दी होणार नाही, याची खबरदारी पोलीस व रेल्वे प्रशासन घेत आहेत. मात्र, रेल्वे प्रवासात सोशल डिस्टन्सिंग शक्य नाही. त्यामुळे कोरोना काळजी केंद्र, स्वतंत्र रुग्णालये, जम्बो केंद्रे आणखी काही काळासाठी सुरू ठेवण्यात येणार आहेत. सात जम्बो कोविड  केंद्रे राहणार सुरूखबरदारी म्हणून महापालिकेने सात जम्बो कोविड केंद्र आणि ३९ कोविड काळजी केंद्र ३१ मार्चपर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर यापुढे दररोज नोंद होणाऱ्या बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे का? याकडे पालिकेचे बारकाईने लक्ष असणार आहे, तर दुसरीकडे लसीकरण मोहीमही नियमित सुरू ठेवली जाणार आहे.

टॅग्स :मुंबईमुंबई उपनगरी रेल्वेमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसमुंबई महानगरपालिका