आता ‘तो’ आवाज येणार नाही
By Admin | Updated: May 20, 2015 02:05 IST2015-05-20T02:05:18+5:302015-05-20T02:05:18+5:30
वॉर्ड क्रमांक ४ मधील अरुणाच्या खोलीच्या बाहेरून जाताना गायत्री मंत्र, सद्गुरू वामनराव पै यांची प्रार्थना आणि अरुणाचा आवाज कानावर पडायचा.

आता ‘तो’ आवाज येणार नाही
वॉर्ड नं ४ : परिचारिकांनी दिला अरुणाच्या आठवणींना उजाळा
मुंबई: वॉर्ड क्रमांक ४ मधील अरुणाच्या खोलीच्या बाहेरून जाताना गायत्री मंत्र, सद्गुरू वामनराव पै यांची प्रार्थना आणि अरुणाचा आवाज कानावर पडायचा. अरुणा आहे याची जाणीव व्हायची. पण आता तो आवाज कधीच ऐकू येणार नाही.
केईएम रुग्णालयाचे काम नेहमीप्रमाणे सकाळी सुरू झाले. पण अजूनही अरुणाच्या निधनातून न सावरलेल्या केईएमच्या कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर एक उदास भाव स्पष्टपणे दिसून येत होता. कर्तव्यात कधीही कुठेही कमी न पडणारे डॉक्टर, परिचारिका, रुग्णालयीन कर्मचारी आपापले काम करीत असतानाच अरुणाच्या आठवणींना उजाळा देत होते.
नेहमीप्रमाणे सकाळी सहा-साडेसहाच्या सुमारास वॉर्ड क्रमांक चारला जाग आली. पण एक उदास, भकासपणा जाणवत होता. कारण तिथून आता कायमस्वरूपी अरुणाच्या अस्तित्वाच्या खुणा पुसल्या गेल्या आहेत. तरीही अरुणा सगळ््यांच्या आठवणीत कायम जिवंत राहणार असल्याचे मत इथे काम करणाऱ्या आया, परिचारिकांनी व्यक्त केले. अरुणाला बोलता येत नव्हते, पण ती प्रतिसाद देत होती. तिच्या खोलीला नेहमीच कुलूप असायचे, पण तिचा आवाज बाहेर यायचा. काहीवेळा तिला वेदना होत असतील म्हणून ती ओरडायची. ती ओरडली किंवा मोठा आवाज आला तरीही लगेच आम्ही आत जाऊन पाहायचो. दिवसातून दोन ते तीन वेळा तरी तिला पाहायला आम्ही आत जायचोच. तिला नैसर्गिक विधीच्या वेळेस मदत करणे, तिला स्पंजिंग करणे याची
वेळ कधीच चुकली नव्हती, असे आयाबाई प्रभावती जाधव यांनी सांगितले.
तिला दोन तासांनी काही ना काही खायला दिले जायचे. आधी त्या खाऊ शकत होत्या. पण कालांतराने त्यांना खायला त्रास व्हायचा. यामुळे मेसमधून आलेले अन्न आम्ही त्यांना कुस्करून खालया द्यायचो. परिचारिका, आयाबार्इंनी हाक मारली की अरुणा नेहमी आवाज करून प्रतिसाद द्यायची. आज सकाळी त्यांची खोली उघडली होती. खोलीत कोणीच नाही, रेडिओचा आवाज नाही हे पाहून मन सुन्न झाले. आता परत इथे अरुणा दिसणार नाही. तिचा आवाज ऐकू येणार नाही याचा विचार करवत नाही. त्यांची सवय झाली होती, असे आयाबाई सुनीता परमार आणि सगुणा गायकवाड यांनी सांगितले.
1अरुणाला वाहिली आदरांजली : अरुणा ज्या खोलीत अनेक वर्ष होती, तिथे आज तिचा फोटो ठेवण्यात आला होता. तिच्या खाटेवर गुलाबाच्या फुलांच्या पाकळ््या टाकण्यात आल्या होत्या. खाटेवर तिचा फोटो ठेवण्यात आला होता. उदबत्त्या आणि एक मेणबत्ती लावण्यात आली होती.
2त्या खोलीचे काय करणार, अजूनही निश्चित नाही... गेल्या अनेक वर्षांपासून अरुणा तिथेच राहत होती.
आता अरुणा या जगात नाही, त्या खोलीत तिच्या अनेक आठवणी आहेत. पण तरीही ती खोली तशीच बंद ठेवणार की त्याचा वापर दुसऱ्या रुग्णांसाठी करणार, हे अजूनही निश्चित झालेले नाही.