मुंबई : कोस्टल रोडवरील पथदिव्यांच्या खांबांवरील तांब्याच्या तारा चोरण्याच्या घटना वाढल्याने महापालिका आणि कंत्राटदार हैराण झाले आहेत. या चोरीप्रकरणी कंत्राटदाराने पोलिस ठाण्यात पाच ते सहा तक्रारी केल्या आहेत. मात्र, चोरांचा बंदोबस्त होऊ न शकल्याने पालिकेने आता तांब्याऐवजी ॲल्युमिनियमच्या तारांचा वापर करण्याचे ठरवले आहे. या तारा या तांब्यापेक्षा स्वस्त असल्या तरी त्याचे आयुर्मान दीर्घकालीन नसते. मात्र, कोस्टल रोडवरील चोरीला आळा घालण्यासाठी पालिकेने या पर्यायाचा वापर करण्याचे ठरवले आहे.
सहा तक्रारी दाखलकोस्टल रोडवरील लव्ह ग्रोव्ह उड्डाणपूल, हाजीअली उड्डाणपूल येथील पथदिव्यांच्या खांबांच्या खालचे काँक्रीट फोडून तांब्याच्या तारा बाहेर काढल्या जातात. त्यामुळे पुलावरील दिवे अनेकदा बंद पडतात. या प्रकरणी अज्ञात व्यक्तींविरोधात पोलिस ठाण्यात सहा तक्रारी करण्यात आल्या आहेत.
सोशल मीडियावर चर्चा कोस्टल रोडवरील पथदिव्यांच्या खांबांवरील तांब्याच्या तारा चोरीला गेल्यामुळे तिथे गेल्या महिनाभरापासून अंधार आहे. जिथे पादचाऱ्यांना चालण्यासही परवानगी नाही, तिथे चोर सहज आत घुसतो, इतक्या जाडजूड तांब्याच्या तारा उचलून नेतो आणि आपल्या सरकारी यंत्रणेला याची साधी खबरही लागत नाही, असे ट्विट खासदार वर्षा गायकवाड यांनीही ‘एक्स’वर केले आहे.
निविदांची छाननी प्रक्रिया सुरूकोस्टलच्या ७० हेक्टर मोकळ्या जमिनीच्या विकासासाठी मागविलेल्या निविदांना पहिल्या वेळी प्रतिसाद न मिळाल्याने प्रक्रियेला मुदतवाढ दिली. पाच नामवंत विकासकांचा त्यास प्रतिसाद मिळाला असून पालिकेकडून, त्याची छाननी प्रक्रिया सुरू आहे. ती पूर्ण झाल्यानंतर या संदर्भातील अंतिम प्रस्ताव आयुक्तांना मंजुरीसाठी सादर केला जाणार आहे.