आता भर छुप्या प्रचारावर
By Admin | Updated: April 21, 2015 05:43 IST2015-04-21T05:43:50+5:302015-04-21T05:43:50+5:30
महापालिका निवडणुकीसाठी सुरू असलेल्या प्रचाराच्या तोफा सोमवारी थंडावल्या. अखेरच्या दिवशी रॅली काढून सर्वच उमेदवारांनी मतदारांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न केला.

आता भर छुप्या प्रचारावर
नवी मुंबई : महापालिका निवडणुकीसाठी सुरू असलेल्या प्रचाराच्या तोफा सोमवारी थंडावल्या. अखेरच्या दिवशी रॅली काढून सर्वच उमेदवारांनी मतदारांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न केला. सायंकाळी ५नंतर शहरातील होर्डिंग्ज व बॅनर हटविण्यास सुरुवात झाली. सर्वांनीच व्यक्तिगत भेटीगाठीवर लक्ष दिले असून, सोशल मीडियावरून मात्र प्रचार सुरूच आहे.
शहरात जवळपास एक महिन्यापासून उमेदवारांनी जोरदार प्रचार सुरू केला होता. उमेदवारी अर्ज भरल्यानंतर प्रचारास वेग आला होता. सर्वच राजकीय पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी प्रचार सभा घेऊन व रॅलीच्या माध्यमातून वातावरण ढवळून काढले होते. शेवटच्या दिवशी सर्व १११ प्रभागांमधून रॅलींचे आयोजन केले होते. उन्हाचा पारा चढला असतानाही उमेदवारांनी सायंकाळी ५ वाजेपर्यंत जास्तीतजास्त नागरिकांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न केला. राष्ट्रवादी काँगे्रसने शेवटच्या दिवशी माथाडी मेळावा व पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. सायंकाळी ५ वाजता प्रचार संपला व सर्वांनीच सुटकेचा श्वास सोडला. पालिका प्रशासनाने सर्व उमेदवारांना होर्डिंग्ज व बॅनर काढण्यास सांगितले आहे. सायंकाळी ते हटविण्याचे काम सुरू होते. निवडणूक विभागाची २० पथके शहरात तैनात केली असून, ती आचारसंहितेचे तंतोतंत पालन होत आहे का, याची माहिती घेत आहेत.
प्रचाराची मुदत संपली तरी सोशल मीडियामधून मात्र जोरदार प्रचार सुरू असून, मतदानापर्यंत तो सुरूच राहण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांनी शहरातील चारही मतदान मोजणी केंद्रांना भेटी देऊन तेथील तयारीचा आढावा घेतला. सीबीडीतील राजीव गांधी स्टेडियममध्ये जाऊन तेथील ईव्हीएम मशीन व इतर निवडणूक यंत्रणेची माहिती घेतली. मंगळवारी शहरातील ७५० मतदान केंद्रांवरील कर्मचाऱ्यांना ईव्हीएम मशीनचे वाटप करण्यात येणार आहे. निवडणुकीसाठी सर्व तयारी झाली असल्याची माहिती आयुक्तांनी दिली.