आता वाड्यांना मिळणार आरोग्यसेवा

By Admin | Updated: April 18, 2015 23:05 IST2015-04-18T23:05:02+5:302015-04-18T23:05:02+5:30

हा भाग आदिवासीबहुल तालुका म्हणून ओळखला जातो. या भागातील नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

Now the hamlets will get access to healthcare | आता वाड्यांना मिळणार आरोग्यसेवा

आता वाड्यांना मिळणार आरोग्यसेवा

कर्जत : हा भाग आदिवासीबहुल तालुका म्हणून ओळखला जातो. या भागातील नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. आरोग्य हक्काबाबत जनजागृती करतानाच त्यांना योग्य आरोग्यसेवा मिळावी याकरिता प्रयत्नशील असलेल्या दिशा या सामाजिक संस्थेच्या वतीने फिरता दवाखाना सुरू करण्यात आला आहे. या फिरत्या दवाखान्याचे शुक्रवारी लोकार्पण करण्यात आले.
येथील आदिवासी पाड्यात आजही आरोग्याची समस्या गंभीर आहे. डोंगरदऱ्यात वसलेल्या या समाजापर्यंत आरोग्यसुविधा पोहोचण्यास वेळ लागत असून त्यात मृत्यू झाल्याच्या घटनाही घडलेल्या आहेत. याला आळा घालण्यासाठीच दिशातर्फे पुढाकार घेण्यात आला. अशोक पिरामल फाऊंडेशनच्या सहकार्याने, दिशा केंद्र कर्जत यांच्या वतीने फिरत्या दवाखान्याचे लोकार्पण कर्जत तालुक्यातील कशेळेजवळील वडाची वाडी येथे केले. आमदार सुरेश लाड यांच्या हस्ते फीत कापून हा दवाखाना सुरू करण्यात आला. याप्रसंगी अशोक पिरामल ग्रुपच्या अध्यक्षा ऊर्वी पिरामल, विजयाश्री, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अजित गवळी, कर्जतचे तहसीलदार रवींद्र बाविस्कर, पोलीस निरीक्षक रमेश रतन पाटील, भाजपचे तालुकाध्यक्ष रमेश मुंढे, डॉ. शशीकांत देसाई, कडाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. बी. बी. वळवी आदी उपस्थित होते.
अशोक पिरामल फाऊंडेशनच्या सहकार्याने दिशा केंद्राला एक गाडी (फिरता दवाखाना) देण्यात आली आहे. या गाडीतून डॉ. संजय डाखोरे, नर्स सुमिता तांबे, कर्मचारी रवी भोई आणि चालक जगदीश ओखारे हे सेवा बजावणार आहेत. या चारही जणांचा आमदार सुरेश लाड यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. लीला सुर्वे यांनी प्रास्ताविक केले. भाजपचे तालुकाध्यक्ष रमेश मुंढे यांनी फिरत्या दवाखान्यामुळे नागरिकांना आरोग्य सुविधा मिळेल, असा विश्वास व्यक्त केला. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अजित गवळी यांनी, फिरत्या दवाखान्याच्या गरज होती, या सुविधेचा लाभ घ्या, असे आवाहन केले.
या दवाखान्यामुळे औषधपाण्याची गरज असलेल्या अशा अनेक जणांचे प्राण वाचू शकतील, त्यांना विनासायास सेवा मिळेल, असे आमदार सुरेश लाड यांनी सांगितले. सूत्रसंचालन अनिल सोनावणे यांनी केले, तर अशोक जंगले यांनी आभार मानले. याप्रसंगी सुशीला भोई, विमल देशमुख, अनिता जाधव, वैष्णवी दभडे, जयंत रुढे आदींसह वाडीवरील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)

Web Title: Now the hamlets will get access to healthcare

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.