खाडीतील माशांवर आता खवय्यांचा भर
By Admin | Updated: June 19, 2015 00:05 IST2015-06-19T00:05:59+5:302015-06-19T00:05:59+5:30
समुद्रातील मासेमारीवर सध्या बंदी असल्यामुळे स्थानिकांनी खाडीतील माशांवर आपला उदरनिर्वाह चालविण्यास सुरूवात केली आहे

खाडीतील माशांवर आता खवय्यांचा भर
वसई : समुद्रातील मासेमारीवर सध्या बंदी असल्यामुळे स्थानिकांनी खाडीतील माशांवर आपला उदरनिर्वाह चालविण्यास सुरूवात केली आहे. दरवर्षी जून ते आॅगस्ट दरम्यान समुद्रात मासेमारी करण्यास बंदी असते. त्यामुळे खाडी, नदी व तलावातील माशांवर खवय्ये आपली भूक भागवत आहेत.
पावसाळ्यात समुद्रातील मासेमारीवर बंदी घालण्यात येते. त्यामुळे सुमारे दोन ते अडीच महिने मच्छीबाजार ओस पडतो. या दिवसात खवय्ये सुके बोंबील, जवळा, सोडे, खारं, खेकडे व खाडीतील लहान मच्छीवर भर देतात.
खोल समुद्रातील मासेमारी सर्वसाधारणपणे नारळी पौर्णिमेनंतर पुन्हा सुरू होते. या काळात पापलेट, हलवा, रावस, सुरमई आदी मोठे मासे बाजारात पहावयास मिळत नाहीत. बंदीच्या काळात मच्छीमार बोटींची दुरूस्ती व डागडुजीची कामे करतात. काही मच्छीमार आपल्या कुटूंबासह विविध भागात जातात. नारळी पौर्णिमेच्या दिवशी समुद्राला नारळ दिल्यानंतर मच्छीमार आपल्या बोटी मासेमारीसाठी समुद्रात नेतात.
पावसाळ्याच्या दिवसामध्ये समुद्रातील वातावरणही मासेमारीसाठी पोषक नसते. त्यामुळे केंद्र व राज्य सरकारने या कालावधीत मासेमारी करण्यास मागील अनेक वर्षांपासून बंदी घातली आहे. बंदी असतानाही काही मच्छीमार खोल समुद्रात मासेमारी करतात. (प्रतिनिधी)