Join us

आता मंड्याही दिसणार सुंदर, स्वच्छ; रूपडे पालटण्यासाठी पालिका खर्च करणार १०५ कोटी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2024 09:43 IST

पालिकेच्या बाजार विभागाने सद्य:स्थितीत ११ मंड्यांचा पुनर्विकास हाती घेतला आहे.

मुंबई : पालिकेच्या बाजार विभागाने सद्य:स्थितीत ११ मंड्यांचा पुनर्विकास हाती घेतला आहे. त्यापैकी महात्मा ज्योतिबा फुले मंडईचे ३५ टक्के काम काम पूर्ण झाले असून दुसऱ्या टप्प्यातील पुनर्विकासासाठी अर्थसंकल्पात ५५ कोटींची तरतूद केली आहे. याशिवाय शिरोडकर मंडईचेही काम आतापर्यंत २० टक्के एवढे झाले असून, त्यासाठी अर्थसंकल्पात २ कोटी ८० लाखांची तरतूद पालिकेकडून केली आहे. मुंबईतील अनेक मंड्यांच्या दुरुस्तीची कामे पालिकेकडून हाती घेतली असून यंदाच्या अर्थसंकल्पात एकूण १०५ कोटींची तरतूद केली आहे. त्यामुळे मुंबईकरांना आता तरी पालिकेच्या मंड्यांत बदल होऊन स्वच्छ वातावरण व सुविधा मिळू शकेल, अशी अपेक्षा आहे. 

अनेक वर्षांपासून महात्मा फुले मंडईचे काम सुरू आहे. ही मंडई तब्बल २२,३९४.६२ चौरस मीटर क्षेत्रफळावर उभी असून त्यापैकी ६,६८७ चौरस मीटर क्षेत्रफळावर इंग्रजी भाषेतील ‘एल’ आद्याक्षराच्या आकारात मंडईतील पुरातन वारसा वास्तू उभी आहे. या वास्तूला धक्का न लावता ७,६००.१७ चौरस मीटर क्षेत्रफळाचा पुनर्विकास होणार असून, १९,७३७.७० बांधकाम प्रस्तावित आहे. याच्या दुसऱ्या टप्प्यातील बांधकामासाठी अर्थसंकल्पात ५५ कोटींची तरतूद आहे. याप्रमाणेच बाबू गेनू मंडईचे ८०% काम व टोपीवाला मंडईचे ५% काम आतापर्यंत पूर्ण झाले आहे. 

७ मंड्यांचे आराखडे मंजुरीच्या प्रक्रियेत असल्याची माहिती बाजार विभागाकडून दिली. कुलाबा मंडई, परळ गाव मंडई, हेमंत मांजरेकर मंडई, मुलुंड पूर्व मंडईच्या व्यापक संरचनात्मक दुरुस्तीची पूर्ण झाली आहेत.

शिफारशींचे काय ? 

मंडयांमध्ये अधिकृत फेरीवाल्यांची सोय केल्यास मुंबईतील पदपथ मोकळे होऊ शकतील. त्यामुळे पालिकेने आपल्या आगामी अर्थसंकल्पात कमीत कमी १२० नवीन पालिका मंडयांची बांधणी करण्याची तरतूद करावी. यामुळे अनधिकृत फेरीवाल्यांची संख्या ही नियंत्रणात येण्यास मदत होऊ शकेल, अशी शिफारस वॉचडॉग फाउंडेशनकडून पालिकेला केली होती. या शिफारशीनुसार किती नवीन मंडया पालिका बांधणार याची माहिती द्यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

टॅग्स :मुंबईभाज्याबाजार