Join us  

आता वीजबिल मिळणार वेळेत, अचूक बिलासाठी मोबाइल मीटर रीडिंग अ‍ॅपची मदत

By ऑनलाइन लोकमत | Published: August 05, 2018 5:47 AM

महावितरणच्या ग्राहकांना वीजबिलांची छपाई व ते ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी सद्य:स्थितीत साधारणत: ७ ते ८ दिवसांचा वेळ लागतो.

मुंबई : महावितरणच्या ग्राहकांना वीजबिलांची छपाई व ते ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी सद्य:स्थितीत साधारणत: ७ ते ८ दिवसांचा वेळ लागतो. वेळेत बिल न मिळाल्याने बिल भरण्यास उशीर होतो. त्यामुळे अनेकदा देयक प्रदान दिनांक अंतर्गत मिळणारी सूटही मिळण्यास अडचणी येतात. शिवाय वेगवेगळ्या एजन्सींद्वारे वीजबिलांची छपाई व वितरण होत असल्यामुळे त्यावर संनियंत्रण ठेवणे कठीण होते. हे सर्व टाळण्यासाठी महावितरणने शनिवारपासून केंद्रीय पद्धतीने वीजबिलाच्या छपाई व वितरणास सुरुवात केली आहे. याचा फायदा राज्यातील महावितरणच्या अडीच कोटींपेक्षा अधिक ग्राहकांना होईल. त्यांना अचूक व वेळेत वीजबिल मिळणे शक्य होणार आहे.महावितरणच्या मोबाइल मीटर रीडिंग अ‍ॅपमुळे प्रत्यक्षवेळी (रिअल टाइम) मीटरवाचन, तसेच चेक रीडिंग उपलब्ध होत आहे. मुख्यालयातील सर्व्हरवर बिल तयार करण्यात येणार असून, हे बिल परिमंडल स्तरावर वीजबिल वितरणासाठी नियुक्त करण्यात येणाऱ्या एजन्सीकडे २४ तासांत पाठविण्यात येईल. त्यानंतर, या एजन्सीकडून सदर वीजबिल शहरी भागात ४८ तासांत आणि ग्रामीण भागात ७२ तासांत वितरित करण्यात येईल. या नव्या प्रक्रियेमुळे ग्राहकांना जास्तीतजास्त अचूक वीजदेयक मिळेल, तसेच त्यांना वीजदेयक भरण्यासाठी अधिकचा कालावधी मिळाल्यामुळे, वीजदेयक भरणा केंद्रातील रांगा कमी होतील व देयक भरणेदेखील अधिक सोयीचे होणार आहे.

टॅग्स :वीज