Join us  

आता धनंजय मुडेंचेही मुख्यमंत्र्यांना पत्र, उद्धव ठाकरे कधी निर्णय घेतील ?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2021 9:46 AM

राज्यातील सर्व पत्रकार, वृत्त वाहिन्यांचे प्रतिनिधी कोरोना महामारीच्या काळात आपला जीव धोक्यात घालून वार्तांकनाचे व जनजागृतीचे काम करत आहेत.

ठळक मुद्देराज्यातील सर्व पत्रकार, वृत्त वाहिन्यांचे प्रतिनिधी कोरोना महामारीच्या काळात आपला जीव धोक्यात घालून वार्तांकनाचे व जनजागृतीचे काम करत आहेत.

मुंबई - राज्यातील प्रसिद्धी आणि दृकश्राव्य माध्यमांतील सर्व पत्रकार, कॅमेरामन यांना तत्काळ फ्रंटलाईन वर्कर्स घोषित करून लसीकरणात त्यांना प्राधान्य देण्याची मागणी माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून केली आहे. त्यानंतर, आता राज्य सरकारमधील सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनीही याबाबत मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. त्यामुळे, आतातरी मुख्यमंत्री निर्णय घेतील का, असा सवाल अनेक पत्रकार विचारत आहेत. 

राज्यातील सर्व पत्रकार, वृत्त वाहिन्यांचे प्रतिनिधी कोरोना महामारीच्या काळात आपला जीव धोक्यात घालून वार्तांकनाचे व जनजागृतीचे काम करत आहेत. या सर्व माध्यम प्रतिनिधींना फ्रंट लाईन वर्कर्सचा दर्जा देऊन त्यांचे प्राधान्याने लसीकरण करावे, अशी मागणी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी केली आहे. मुंडे यांना याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्राद्वारे विनंती केली आहे.  राज्यातील पत्रकारांनीही या मागणीसाठी दोन दिवसांपूर्वी ऑनलाईन आंदोलन छेडले होते. विशेष म्हणजे, सोशल मीडियातूनही पत्रकार वारंवार सरकारला हा निर्णय घेण्याची मागणी करत आहेत. गृहमंत्र्यांसह महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांनीही ही मागणी लावून धरली आहे. मात्र, बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीतही याबाबत कसलाही निर्णय झाला नाही. त्यामुळे, मुख्यमंत्री पत्रकारांच्या आरोग्यासाठी कधी निर्णय घेतील, असा प्रश्न अनेकजण समाज माध्यमातून विचारत आहेत.  

12 राज्यात पत्रकारांना फ्रंटलाईन वर्सर्सचा दर्जा

मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे की, देशातील सुमारे 12 राज्यांत प्रसिद्धी आणि दृकश्राव्य माध्यमांतील पत्रकारांना फ्रंटलाईन वर्कर्स म्हणून जाहीर करण्यात आले आहे. दुर्दैवाने, महाराष्ट्रात मात्र हा निर्णय अद्यापही प्रलंबित आहे. राज्यातील अनेक ज्येष्ठ पत्रकार, पत्रकारांच्या विविध संघटना यासंदर्भात सातत्याने मागणी करीत आहेत. परवा तर राज्यातील पत्रकारांनी ऑनलाईन माध्यमांतून सांकेतिक आंदोलन सुद्धा केले. कोरोना साथीच्या पहिल्या लाटेत आपण अनेक पत्रकारांना मुकलो. या दुसर्‍या लाटेत सुद्धा या रोगाला बळी पडलेल्यांची संख्या मोठी आहे. अशात त्यांच्या सुरक्षेची, जिवितेची काळजी घेणे हे आपले कर्तव्य आहे. त्यांना फ्रंटलाईन वर्कर्स जाहीर केल्यास आपसुकच लसीकरणात त्यांना प्राधान्य मिळेल. 

टॅग्स :धनंजय मुंडेकोरोना वायरस बातम्याकोरोनाची लसपत्रकार