Join us  

आता यापुढे शाळांना सुट्टी देण्याचा निर्णय महानगरपालिकेचा - विनोद तावडे

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2018 8:03 PM

 मुंबई  शहर आणि उपनगरात अतिवृष्टीची शक्यता लक्षात घेऊन आगामी काळात शाळा बंद ठेवण्याबाबतचा निर्णय मुंबई महानगरपालिका घेईल, असे  शिक्षणमंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री विनोद तावडे यांनी स्पष्ट केले.

मुंबई :  मुंबई  शहर आणि उपनगरात अतिवृष्टीची शक्यता लक्षात घेऊन आगामी काळात शाळा बंद ठेवण्याबाबतचा निर्णय मुंबई महानगरपालिका घेईल, असे  शिक्षणमंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री विनोद तावडे यांनी स्पष्ट केले.

गेल्या दोन दिवसात मुंबई आणि उपनगरात झालेल्या मुसळधार पावसानंतर पालकमंत्री तावडे यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आपत्ती निवारण कक्षाला भेट दिली.  पावसाची परिस्थिती, आगामी काळात अतिवृष्टी झाल्यास विविध शासकीय यंत्रणांनी समन्वयाने करावयाच्या उपाययोजनांचा त्यांनी आढावा घेतला.

बैठकीला महापौर विश्वनाथ महाडेश्वर, आमदार अॅड. आशिष  शेलार, महानगरपालिकेचे आयुक्त अजोय मेहता, पोलीस आयुक्त सुबोध जयस्वाल, कोकणचे विभागीय आयुक्त जगदीश पाटील, पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक ए.के.गुप्ता, मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांच्यासह विविध विभागाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते. मुंबई आणि उपनगरात अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने सांगितल्यानंतर अतिवृष्टी होत असेल तर विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेऊन शाळा बंद ठेवण्याबाबतचे परिपत्रक त्या दिवशी सकाळी ६ वाजेपर्यंत बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत जारी करण्यात येईल आणि हे परिपत्रक सर्व शाळांसाठी असेल, असे श्री. तावडे यांनी स्पष्ट केले.

गेल्या दोन दिवसात झालेली मुंबई आणि उपनगरात अतिवृष्टी लक्षात घेता येणाऱ्या काळात अशा प्रकारची अतिवृष्टी झाली तर तत्काळ कार्यवाही करण्यासाठी शासकीय कृती यंत्रणेची एक समन्वय समिती करण्यात येईल. ही कृती समिती तत्काळ व्हिडिओ कॉन्फरन्सदवारे सर्व यंत्रणेशी जोडली जाईल. यामध्ये बृहन्मुंबई महानगरपालिका, एमएमआरडीए, रेल्वे, बेस्ट, म्हाडा, जिल्हाधिकारीकार्यालये, परिवहन असे सर्व शासकीय यंत्रणा एकत्रपणे अधिक समन्वय आणि समयसूचकतेने काम करतील असे निर्देशही श्री. तावडे यांनी यावेळी दिले.

 आपत्कालीन व्यवस्थापन, नियंत्रणासाठी वेळेत प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्यामुळे संभाव्य आपत्तीच्या काळात सर्व यंत्रणांनी अधिक सतर्कता, समन्वय व तत्परतेने प्रयत्न करणे आवश्यक आहे. मुंबई आणि उपनगरात जवळपास २२५ अशी ठिकाणे आहेत की जेथे पाणी साचून राहते. पण या दोन दिवसात १२० ठिकाणी पाण्याचा निचरा योग्य पध्दतीने होत होता. तर उर्वरित १०५ ठिकाणीही पावसाचे पाणी साचून राहू नये यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्यात येत असल्याचे श्री. तावडे यांनी यावेळी सांगितले.

टॅग्स :विनोद तावडेमुंबई