आता ४१ अपक्ष उमेदवारांचे आव्हान
By Admin | Updated: February 8, 2017 04:40 IST2017-02-08T04:40:54+5:302017-02-08T04:40:54+5:30
मुंबई उपनगर जिल्ह्यातील वांद्रे पूर्व ते सांताक्रुझ पूर्वपर्यंत असलेल्या एच ईस्ट वॉर्डमध्ये अपक्ष उमेदवारांनी अन्य राजकीय पक्षांच्या तगड्या उमेदवारांसमोर

आता ४१ अपक्ष उमेदवारांचे आव्हान
मुंबई : मुंबई उपनगर जिल्ह्यातील वांद्रे पूर्व ते सांताक्रुझ पूर्वपर्यंत असलेल्या एच ईस्ट वॉर्डमध्ये अपक्ष उमेदवारांनी अन्य राजकीय पक्षांच्या तगड्या उमेदवारांसमोर चांगलेच आव्हान उभे केले. या वॉर्डात एकूण ६२ उमेदवारांनी अपक्ष म्हणून अर्ज भरले होते. मात्र ७ फेब्रुवारी हा उमेदवारी माघार घेण्याचा शेवटचा दिवस असल्याने या दिवशी तब्बल २१ अपक्ष उमेदवारांनी माघार घेतली. त्यामुळे अनेक उमेदवारांचा जीव भांड्यात पडला.
एच ईस्ट वॉर्डमध्ये नव्या फेररचनेनुसार ८७ ते ९६ हे प्रभाग येतात. पूर्वी हा वॉर्ड प्रभाग ८१ ते ९१ असा होता. २०१२ साली झालेल्या मुंबई महापालिका निवडणुकीत या वॉर्डमधून शिवसेनेचे ४, काँग्रेसचे ३, मनसेचे २, भाजपाचा एक उमेदवार निवडून येतानाच अपक्ष एक उमेदवार निवडून आला होता. यंदाच्या पालिका निवडणुकीत मात्र अपक्ष उमेदवारांनी अन्य राजकीय पक्षांच्या उमेदवारांमध्ये धास्तीच निर्माण केली आहे. प्रत्येक वॉर्डमध्ये मोठ्या संख्येने अपक्ष उमेदवार उभे राहिले आहेत. आपल्या पक्षाकडून उमेदवारी न मिळाल्यामुळे काहींनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरले आहेत. एच ईस्ट वॉर्डमध्येही अपक्ष उमेदवारांची संख्या मोठी होती. या वेळी पालिका निवडणुकीत तब्बल ६२ उमेदवारांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरले होते. परंतु यातील तीन जणांनी ६ फेब्रुवारी तर तब्बल १८ उमेदवारांनी ७ फेब्रुवारी रोजी माघार घेतली. त्यामुळे अपक्ष उमेदवारांची संख्या ६२वरून थेट ४१ वर आली. (प्रतिनिधी)