आता बाप्पालाही बोलवा आॅनलाईन
By Admin | Updated: September 9, 2015 08:22 IST2015-09-08T23:23:35+5:302015-09-09T08:22:29+5:30
आॅनलाईन कपडे, गीफ्टस, राखी बुकींगनंतर आता माऊसच्या एका क्लिक वर बाप्पांची आपल्याला हवी तशी मूर्तीची नोंदणी करता येणार आहे. ती करतांना आपल्याला हव्या त्या रुपातल्या

आता बाप्पालाही बोलवा आॅनलाईन
- भाग्यश्री प्रधान , ठाणे
आॅनलाईन कपडे, गीफ्टस, राखी बुकींगनंतर आता माऊसच्या एका क्लिक वर बाप्पांची आपल्याला हवी तशी मूर्तीची नोंदणी करता येणार आहे. ती करतांना आपल्याला हव्या त्या रुपातल्या बाप्पा नोंदवू शकतो. यामध्ये वरदहस्त, मुषक, जास्वंदी बालगणेश, दगडुशेठ हलवाई, लालबागचा राजा, पगडीवाले आदी रुपांबरोबरच कस्टमाईज बाप्पा असे एकसे बढकर एक स्पेशल रुपातल्या मूर्त्या पहावयास मिळणार आहेत. आॅनलाईन नोंदणीकडे ग्राहकांचा अधिक कल असून आतापर्यंत या माध्यमातून ५०० मूर्त्यांची नोंदणी झाली आहे.
कस्टमाईज बाप्पा बनविताना ग्राहकांना मंगलमूर्ती डॉट कॉमच्या कलाकारांना फोन लावून आपल्याला हवे त्याप्रमाणे बाप्पाच्या लोभस रुपाचे वर्णन करता येणार असून त्यानंतर हे कलाकार त्याचे स्केच काढून त्याप्रमाणे मूर्ती तयार करणार आहेत. यासाठी तीन वर्ष मेहनत करून ७०० शाडूच्या मूर्ती बनवणाऱ्या कलाकारांना एकत्र केले असल्याचे मंगलमूर्ती डॉट कॉमचे संस्थापक महेश कदम यांनी सांगितले. आॅनलाईन बुकींग करण्याचे या वेबसाईटचे यंदाचे पहिलेच वर्ष आहे. संकेतस्थळांच्या माध्यमातून पर्यावरणपुरक शाडू माती आणि कागदी लगद्यापासून मूर्ती घडवणाऱ्या कलाकारांना हक्काच व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. मूर्तीकारांच अस्तित्व जगाला कळावे आणि त्यांच्या मेहनतीचा मोबदला त्यांना मिळावा यासाठीच या वेबची स्थापना केल्याचे त्यांनी सांगितले. तसेच या कार्यात सहभागी झालेल्या प्रत्येक कलाकारांची माहिती या वेबवर लोड केली आहे. साधारण ४.५ फुटापासून ते ८ फुटापर्यंतच्या गणेशमूर्ती ५०० रुपयापासून ते १२ हजार रुपयापर्यंत उपलब्ध आहेत. त्या बनविण्यासाठी लागणारी शाडूची माती गुजरात व मालवणहून मागवली जाते.
तसेच बाप्पांची घरपोच सेवा मिळावी याकरीता ७०-८० जणांची टीम तयार केली आहे. काही जण मात्र आॅनलाईन बुकींग करतात. मात्र, आपल्या लाडक्या बाप्पाला घरात आणण्यासाठी स्वत: ठाणे येथील मंगलमूर्ती डॉट कॉमच्या कार्यालयात येतात, असेही त्यांनी सांगितले.
मूर्तींचे बुकिंग
किशोर कदम, मेघना एरंडे यांसारख्या सुप्रसिद्ध कलाकरांनीही मंगलमूर्ती डॉट कॉम या वेबसाईटद्वारे गणपती बाप्पाच्या मूर्तीचे बुकींग केले आहे.