Join us  

आता वर्षभर हवेच्या गुणवत्तेची पातळी उत्तम ठेवण्यासाठी #सालभर६० मोहीम

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2020 2:58 PM

ग्रेटा थनबर्गसोबत काम केलेली रिधिमा पांडे मोहीमेचे नेतृत्त्व करणार

मुंबई : आता संपूर्ण वर्षभर एअर क्वालिटी इण्डेक्स म्हणजे हवेच्या गुणवत्तेची पातळी (एक्यूआय) आदर्श रहावी म्हणजेच ६० इतकी रहावी, यासाठी त्वरित आवश्यक ती पावले उचलणे गरजेचे आहे. आणि म्हणणून आता अवघ्या १२ वर्षांच्या रिधिमा पांडे या मुलीने #सालभर६० ही मोहीम हाती घेतली आहे. या माध्यमातून हवेच्या गुणवत्तेची पातळी उत्तम ठेवण्याचे उद्दीष्ट आहे. हवेच्या गुणवत्तेचे महत्त्व या माध्यमातून पटवून दिले जाणार आहे. दरम्यान, गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये यूएनकडे प्रस्ताव सादर करणा-या १६ लहान मुलांमध्ये (ग्रेटा थनबर्गसोबत) रिधिमा पांडेचा सहभाग होता.२३ मे रोजी आपण देशव्यापी टाळेबंदीचे ६० दिवस पूर्ण केले असले तरीही, भारताने मानवी समस्यांच्या बाबतीतला सर्वांत वाईट काळ गेल्या काही दिवसांत अनुभवला आहे. या सगळ्या संकटामध्ये एकच चांगली गोष्टी घडली आहे, ती म्हणजे आपल्या आजुबाजूची हवा, वातावरण स्वच्छ झाले आहे. स्वच्छ हवेचा प्रत्येक श्वास आपल्यासाठी किती महत्वाचा आहे, हे या वैश्विक आरोग्य आणीबाणीने आपल्याला दाखवून दिले आहे. नव्या संशोधनातून असेही दिसून आले आहे की, जितका जास्त काळ आपण प्रदूषित हवेत राहू, तितका कोव्हिड-१९ चा धोका व त्यामुळे होणारे मृत्यू वाढत जाऊ शकतात. जागतिक पर्यावरण दिन (५ जून) आता केवळ दोन आठवड्यांवर येऊन ठेपला असताना, झटका डॉट ओआरजी या व्यासपिठाने ६० मिनीटांचा व्हिडिओ तयार केला आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून रिधिमा पांडे ही १२ वर्षीय पर्यावरण कार्यकर्ती #सालभर६० ही मोहीम सुरू करणार आहे.५ जूनच्या जागतिक पर्यावरण दिनानिमित्त राष्ट्रव्यापी डिजिटल मोहिमेत जास्तीत जास्त संख्येने सहभागी होण्याचे आवाहन सर्वसामान्य लोकांना या मोहिमेच्या माध्यमातून करण्यात येत आहे. या मोहिमेत सहभागी होणा-या नागरिकांनी क्लिन एअर फॉर ऑल असे लिहिलेले फलक हातात धरून आपापले फोटो समाजमाध्यमांमध्ये अपलोड करायचे आहेत. इतकेच नव्हे तर, या फोटोंमध्ये पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालय यांना टॅगही करायचे आहे, अशी माहिती वातावरण फाऊंडेशनकडून देण्यात आली.

 

टॅग्स :पर्यावरणकोरोना सकारात्मक बातम्याकोरोना वायरस बातम्यामुंबई