Join us
Daily Top 2Weekly Top 5

आता पोलीस मुख्यालयात ५० टक्के कर्मचारी हजर राहणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2021 07:38 IST

कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी  पोलीस महासंचालकांनी कार्यालयात कर्मचाऱ्यांना ५० टक्के हजेरी लावण्याचे आदेश दिले असताना पोलीस मुख्यालयात त्याची पायमल्ली करण्यात आली होती.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : पोलीस मुख्यालयात ड संवर्गातील सर्व कर्मचाऱ्यांना कार्यालयात उपस्थित राहण्याचा उपसहाय्यकाचा वादग्रस्त आदेश  अखेर रद्द करण्यात आला आहे. ५० टक्के कर्मचारी कार्यालयात हजर राहणार आहेत. ‘लोकमत’ने हा प्रकार उघडकीस आणल्यानंतर ही कार्यवाही करून सुधारित आदेश जारी करण्यात आला,  अपर महासंचालक (प्रशासन) संजीव सिंघल यांनी त्याबाबत सूचना दिल्या

कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी  पोलीस महासंचालकांनी कार्यालयात कर्मचाऱ्यांना ५० टक्के हजेरी लावण्याचे आदेश दिले असताना पोलीस मुख्यालयात त्याची पायमल्ली करण्यात आली होती. महासंचालकांचे उपसहाय्यक (र. व का.)  लेन्सी कोयलो यांनी ड श्रेणीतील  सर्व कर्मचाऱ्यांना एकाच वेळेत (शिफ्ट )कामावर हजर  रहाण्याचे फर्मान बजविले होते.

त्यामुळे कोरोनाची लागण होण्याची धास्ती असताना कार्यालयीन  ड्यूटीची सक्ती करण्यात आल्याने संबंधित कर्मचाऱ्यांची अवस्था ‘इकडे आड तिकडे विहीर’ अशी झाली आहे. ‘लोकमत’ने त्याबाबत सोमवारी वृत्त प्रसिद्ध केले. त्यानंतर पोलीस वर्तुळात चर्चा रंगली. या वृत्ताची तत्काळ गांभीर्याने दखल घेण्यात आली. कोयलो यांचा आदेश रद्द करण्यात आला. 

पोलीस अप्पर महासंचालक (प्रशासन) संजीव सिंघल म्हणाले, ‘ड ’संवर्गातील एकूण कर्मचाऱ्यांना कार्यालयात ५० टक्के उपस्थिती लावण्यात आलेली आहे. सरसकट सर्वांना ड्यूटी लावण्याचा आदेश रद्द केला आहे. कर्मचाऱ्यांच्याबाबत योग्य ती काळजी घेण्याची सूचना त्यांना करण्यात आली आहे. 

टॅग्स :पोलिस