भुलेश्वरच्या सुवर्णकारांना नोटिसा
By Admin | Updated: May 19, 2015 00:27 IST2015-05-19T00:27:49+5:302015-05-19T00:27:49+5:30
अरुंद गल्ल्या, गजबजलेले रस्ते आणि खेटून उभ्या असलेल्या इमारतींमुळे भुलेश्वर, काळबादेवी हा विभाग धोकादायक ठरू लागला आहे़

भुलेश्वरच्या सुवर्णकारांना नोटिसा
शेफाली परब-पंडित ल्ल मुंबई
अरुंद गल्ल्या, गजबजलेले रस्ते आणि खेटून उभ्या असलेल्या इमारतींमुळे भुलेश्वर, काळबादेवी हा विभाग धोकादायक ठरू लागला आहे़ त्यातच इथल्या घराघरांमध्ये सुरू असलेल्या सोन्याला आकार देण्याच्या व्यवसायाने हा परिसर आगीवर वसला आहे. याची गंभीर दखल घेऊन सी विभाग कार्यालयाने अशा कारखान्यांना नोटीस पाठविली आहे़ प्रदूषणमुक्त होण्यासाठी या कारखान्यात खबरदारी घेण्यात यावी, अशी ताकीदच या नोटीसमधून देण्यात आली आहे़
९ मे रोजी काळबादेवी येथील गोकूळ निवासमध्ये लागलेल्या भीषण आगीत अग्निशमन दलाच्या तीन अधिकाऱ्यांना हौतात्म्य आले. या घटनेमुळे शहर भागातील विशेषत: काळबादेवी, भुलेश्वर येथील अरुंद रस्त्यांचा धोका प्रकर्षाने जाणवू लागला़ या विभागांमध्ये प्रामुख्याने इलेक्ट्रॉनिक्स व सोने घडविणारी दुकाने आहेत़ या दुकानांमध्ये वापरण्यात येणाऱ्या ज्वलनशील रसायनांनी या विभागांचा धोका वाढविला आहे़ त्यानुसार पालिकेने अधिकृत कारखान्यांना नोटीस बजावली होती़ या नोटीसची दखल न घेणाऱ्या कारखान्यांवर कठोर कारवाई केली जाणार आहे़
सोन्याचे दागिने वितळवणे, घडविणे व त्यांचे पॉलिश करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या एसिडमुळे या परिसरात प्रदूषण वाढत आहे़ त्यामुळे हे प्रदूषण रोखण्यासाठी खबरदारीच्या उपाययोजना राबवाव्यात, असा इशारा कारखान्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या पश्चिम बंगाल वेल्फेअर असोसिएशनला सी विभागाने नोटिसीद्वारे दिला आहे. याबाबत दोन दिवसांपूर्वीच स्मरणपत्र पाठविण्यात आले असून लवकरच आढावा घेण्यात येईल, असे सी विभाग कार्यालयाच्या साहाय्यक आयुक्त डॉ़ संगीता हसनाळे यांनी सांगितले़
च्एखादी दुर्घटना या विभागामध्ये घडल्यास अशा कारखान्यांमुळे आग अधिकच वाढेल, अशी भीती स्थानिक रहिवासी व्यक्त करीत आहेत़ त्यामुळे सोने घडविणारे हे कारखानेच या विभागातून हद्दपार करण्याची मागणी स्थानिकांकडून होत आहे़ २००१मध्ये अतिरिक्त आयुक्त अजित जैन यांच्या समितीने तशी शिफारसही आपल्या अहवालातून केली होती़ विकास आराखड्यात निवासी क्षेत्र म्हणून जाहीर झालेल्या भुलेश्वर विभागात औद्योगिक कारभार वाढतच असल्याची चिंताही व्यक्त होत आहे़
या कारखान्यांना विरोध का?
या कारखान्यांमध्ये सोने व चांदीचे दागिने चमकविण्यासाठी रसायनांचा वापर केला जातो़ त्यामुळे निघणाऱ्या घातक धुरामुळे भुलेश्वर परिसरातील रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे़ याबाबत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळ, निरी नॅशनल एन्व्हायरोन्मेंट इंजिनीअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट आणि महापालिकेत बैठक झाल्यानंतर कारवाईला सुरुवात झाली़
त्यानुसार स्मशानभूमीतील दूषित वायू बाहेर जाऊ नये यासाठी चिमणीला ज्याप्रमाणे स्क्रबर बसविण्यात येतो़ तसेच येथेही स्क्रबर बसविण्याची सूचना कारखान्यांना करण्यात आली आहे़ या स्क्रबरचा प्रयोग करण्याची शिफारस प्रदूषण महामंडळानेच केली होती़ त्यानुसार या पद्धतीने दागिन्यांचे पॉलिश करताना निघणाऱ्या धुरातील घातक प्रमाण कमी झाल्यास याचा वापर येथील अन्य कारखान्यांसाठी बंधनकारक होईल़
भुलेश्वर, काळबादेवीत
‘नो डेव्हलपमेंट’
मुंबई : भुलेश्वर, काळबादेवी, झवेरी बाजार या विभागांमधील रस्ते अतिशय अरुंद असल्यामुळे आगीची दुर्घटना अथवा आपत्तीकाळात मदत यंत्रणा पोहोचू शकत नाही़ त्यामुळे या विभागांमधील जुन्या इमारतींच्या दुरुस्तीवेळी नियमांमध्ये सूट मागणाऱ्या प्रस्तावांना स्थायी समितीत मंजुरी देण्यात येऊ नये, अशी महत्त्वपूर्ण शिफारस सी विभागाच्या साहाय्यक आयुक्तांनी केली आहे़ परंतु या विषयाचे गांभीर्य बाजूला ठेवून या अधिकाऱ्यावरच कारवाई करण्याची मागणी करीत स्थायी समिती सदस्यांनी आज आपल्या अकलेचे तारे तोडले आहेत़
काळबादेवी येथील गोकूळ निवास गेल्या आठवड्यात आगीच्या भक्ष्यस्थानी पडली़ मात्र या परिसरातील इमारती एकमेकांना खेटून उभ्या असल्याने या दुर्घटनेमुळे बाजूच्या इमारतीही धोकादायक ठरल्या आहेत़ तसेच अरुंद रस्ते व गजबजलेल्या परिसरामुळे गोकूळ निवासपर्यंत मदत पोहोचविण्यास अग्निशमन दल व आपत्कालीन व्यवस्थापन विभागाला शर्थीचे प्रयत्न करावे लागले़ या गंभीर घटनेची दखल घेऊन सी विभागाच्या साहाय्यक आयुक्त डॉ़ संगीता हसनाळे यांनी आयुक्ताना याबाबत पत्र
लिहिले आहे़ हे पत्र मनसेचे
गटनेते संदीप देशपांडे यांनी स्थायी समितीच्या बैठकीच्या आज निदर्शनास आणले़
झवेरी बाजार, श्यामलदास मार्ग, काळबादेवी, भुलेश्वर हे विभाग अरुंद असल्याने येथील जुन्या इमारतींच्या दुरुस्तीचे प्रस्ताव आल्यास प्रीमियम घेऊन मोकळ्या जागेसाठी आवश्यक अटी शिथिल करण्यात येऊ नये, अशी विनंती हसनाळे यांनी आयुक्तांना केली आहे़ मात्र साहाय्यक आयुक्तांनी असे पत्र पाठविणे म्हणजे आयुक्तांनाच आव्हान दिल्यासारखे असल्याचे मत व्यक्त करीत देशपांडे व भाजपाचे गटनेते मनोज कोटक यांनी हसनाळे यांच्यावर कारवाईची मागणी केली़ (प्रतिनिधी)