व्हीव्हीआयपींसाठी हेलिकॉप्टर वापरण्याची सूचना
By Admin | Updated: March 4, 2015 02:20 IST2015-03-04T02:20:23+5:302015-03-04T02:20:23+5:30
अति महत्त्वाच्या व्यक्तींच्या संस्कृतीविरोधात (व्हीव्हीआयपी कल्चर) नागरिकांमध्ये तीव्र भावना असून, त्याची तातडीने नोंद पोलिसांनी घेतलेली दिसते.

व्हीव्हीआयपींसाठी हेलिकॉप्टर वापरण्याची सूचना
डिप्पी वांकाणी - मुंबई
अति महत्त्वाच्या व्यक्तींच्या संस्कृतीविरोधात (व्हीव्हीआयपी कल्चर) नागरिकांमध्ये तीव्र भावना असून, त्याची तातडीने नोंद पोलिसांनी घेतलेली दिसते. एक मार्च रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वरळी क्रीडा संकुलाला भेट दिली. या भेटीमुळे नागरिकांची व वाहनचालकांची प्रचंड गैरसोय झाली व मोठे भांडणही. ही परिस्थिती टाळण्यासाठी विशेष सुरक्षा गटाने (एसपीजी) काही वर्षांपूर्वी अति महत्त्वाच्या व्यक्तींसाठी रस्त्यांऐवजी हेलिकॉप्टर वापरावे, अशी सूचना केली होती. या सूचनेचा आता विचार करावा, असे पोलिसांनी सरकारला सुचविले असून वाहतूक शाखेतील उच्चपदस्थ सूत्रांनी आम्ही या योजनेला मान्यता मिळवू, असे ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. चार ते पाच वर्षांपूर्वी एसपीजीने दिलेल्या प्रस्तावात पंतप्रधान वा अति महत्त्वाच्या व्यक्तींसाठी शहरात हेलिकॉप्टरचा वापर करावा, असे म्हटले होते. आम्ही या प्रस्तावाचा पुन्हा विचार करू व त्यावर सकारात्मक विचार करावा, अशी सरकारला विनंती करू, असे वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. हा प्रस्ताव तत्त्वत: मान्य झाला तर अति महत्त्वाच्या व्यक्तींसाठी आवश्यक तो तपशील व प्रक्रिया पूर्ण केली जाईल, असे हा अधिकारी म्हणाला. महालक्ष्मी रेसकोर्सवर दिवसाचे हेलिपॅड आहे. शिवाय विमानतळ प्राधिकरणाने दिलेले संपूर्ण दिवसभर उपलब्ध होईल असा रेसकोर्सच्या मधोमध हेलिपॅडचा प्रस्तावही प्रलंबित आहे. या मधोमधच्या हेलिपॅडमुळे अति महत्त्वाच्या व्यक्तींची मोठी सोय होईल.
भारतीय विमानतळ प्राधिकरणनेच सुरू केलेल्या महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेंट कंपनीने केलेल्या पाहणीत रेसकोर्सवर हेलिपोर्टचे बांधकाम करणे सहजशक्य असल्याचे आढळले होते. या प्रस्तावाला नागरी विमान वाहतूक महासंचालकांची मान्यता मिळण्याची प्रतीक्षा विमानतळ प्राधिकरणाला आहे. रविवारी आठवड्याच्या अन्य दिवसांइतकी वाहनांची वाहतूक नसते, तरीही अशी परिस्थिती निर्माण झाली. कल्पना करा की रविवार वगळता अन्य दिवशी अति महत्त्वाच्या व्यक्तींच्या वाहनांचा ताफा रस्त्यांवर आल्यास काय होईल? परंतु जर अति महत्त्वाच्या व्यक्तींना विमानतळावरून थेट हेलिकॉप्टरने त्यांच्या कार्यक्रमस्थळी नेण्यात आले तर परिस्थिती खूपच सुसह्य होईल, असे अन्य अधिकाऱ्याने म्हटले.
अति महत्त्वाच्या व्यक्तींना विमानतळावरून थेट हेलिकॉप्टरने त्यांच्या कार्यक्रमस्थळी नेण्यात आले तर परिस्थिती खूपच सुसह्य होईल, असे एका अधिकाऱ्याने म्हटले आहे.