Join us  

‘महारेरा’कडून ४१ बिल्डरांना नोटीस, नोंदणी क्रमांकाशिवाय केली प्लॉट विक्री

By ऑनलाइन लोकमत | Published: February 02, 2024 9:42 AM

Mumnbai: राज्यात अनेक ठिकाणी महारेरा नोंदणी क्रमांकाशिवाय प्लॉट्स पाडून जाहिराती देत प्लॉट्सची विक्री होत असल्याचे निदर्शनास आले आहे. याची महारेराने नोंद घेत राज्यातील ४१ बिल्डरांना ‘कारणे दाखवा नोटीस’ बजावली आहे.

मुंबई - राज्यात अनेक ठिकाणी महारेरा नोंदणी क्रमांकाशिवाय प्लॉट्स पाडून जाहिराती देत प्लॉट्सची विक्री होत असल्याचे निदर्शनास आले आहे. याची महारेराने नोंद घेत राज्यातील ४१ बिल्डरांना ‘कारणे दाखवा नोटीस’ बजावली आहे. प्लॉट्स पाडून विक्रीसाठीही महारेराची नोंदणी असणे बंधनकारक आहे. ४१ बिल्डरांपैकी सर्वांत जास्त २१ पुणे क्षेत्रातील असून १३ कोकण आणि ७ नागपूर क्षेत्रातील आहेत.

नोंदणी क्रमांक देताना आर्थिक, वैधता आणि तांत्रिक अशी तीन पातळीवर छाननी केली जाते. त्यात स्थानिक नियोजन प्राधिकरणांकडून संबंधित प्रस्तावित प्रकल्पाला मिळालेली मंजुरी बिल्डरला सादर करावी लागते. स्थानिक प्राधिकरण त्या प्रकल्पाच्या बिन शेती प्रमाणपत्राशिवाय मालकी, भूखंडाचा आकार, एकूण भूखंडाच्या आणि प्लाॅट्सच्या सीमारेषा या बाबी पाहते. भोगवटा प्रमाणपत्र देताना पाणीपुरवठा, रस्ते, मल:निस्सारण, सार्वजनिक सोयी-सुविधा अशा नागरी सुविधा अत्यावश्यक असतात, त्याच धर्तीवर या प्रकल्पांनाही या सर्व सुविधांची तरतूद करावी लागते. या सर्व बाबींची खात्री करून घेतल्याशिवाय नोंदणी क्रमांक दिला जात नाही.

हे कायद्याचे उल्लंघनप्लाॅट, घरे आणि इमारतींच्या विक्रीसाठी जाहिरात करण्यापूर्वी नोंदणी क्रमांक घेणे अत्यावश्यक आहे. असे असूनही नोंदणी क्रमांक न घेता जाहिरात करणे हे कायद्याचे उल्लंघन आहे शिवाय गुंतवणूकदारांच्या हक्कांवर गदा आणणारे आहे. अशी अनियमितता खपवून घ्यायची नाही, याबाबत आम्ही ठाम आहोत.- अजय मेहता, अध्यक्ष, महारेरा 

फसवणूक होऊ नये म्हणूनप्रकल्प नोंदणीकृत असेल तर बिल्डरांना ग्राहक हिताच्या दृष्टीने अनेक बाबी कराव्या लागतात. हमींची पूर्तता करावी लागते. नोंदणी क्रमांक देताना या सर्व बाबींची महारेराकडून खात्री करून घेतली जाते म्हणून नोंदणीकृत नसलेल्या अशा प्लाॅट्सच्या प्रकल्पातून फसवणूक होऊ नये यासाठी प्लाॅट घेण्याचे टाळावे, असे आवाहन महारेराने केले आहे.

जाहिरात करता येत नाहीप्लाॅट, घरे किंवा इमारतीच्या विक्रीसाठी काही अटींसापेक्ष महारेराची नोंदणी अत्यावश्यक आहे. त्याशिवाय भूखंड, घरे किंवा इमारतींच्या विक्रीसाठी जाहिरात करता येत नाही.

टॅग्स :मुंबईमहारेरा कायदा 2017