आर्थिक शिस्त लावण्याच्या खासदारांच्या सूचना
By Admin | Updated: June 16, 2015 01:00 IST2015-06-16T01:00:10+5:302015-06-16T01:00:10+5:30
महापालिकेच्या कारभारास आर्थिक शिस्त लावण्यात यावी, अनावश्यक गोष्टींवर उधळपट्टी केली जाऊ नये, अशा सूचना ठाण्याचे खासदार

आर्थिक शिस्त लावण्याच्या खासदारांच्या सूचना
नवी मुंबई : महापालिकेच्या कारभारास आर्थिक शिस्त लावण्यात यावी, अनावश्यक गोष्टींवर उधळपट्टी केली जाऊ नये, अशा सूचना ठाण्याचे खासदार राजन विचारे यांनी महापालिका प्रशासनास दिल्या आहेत.
पालिका मुख्यालयात खासदार राजन विचारे व विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांनी आयुक्त दिनेश वाघमारे यांची भेट घेतली. महापालिकेत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनावश्यक कामांना मंजुरी देण्यात आली. उत्पन्नापेक्षा खर्च वाढला असून पालिकेच्या तिजोरीत खडखडाट झाला आहे.
भविष्यात असे प्रकार होऊ नये यासाठी उत्पन्न व खर्चाचा ताळमेळ बसविणे आवश्यक असल्याचे विचारे यांनी स्पष्ट केले. महापालिकेचा एकही प्रकल्प वेळेत पूर्ण होत नाही. परिणामी प्रकल्पांच्या किमती वाढून त्याचा भुर्दंड पालिकेवर पडत आहे. सर्व प्रकल्पांचे काम वेळेत पूर्ण करण्यावर लक्ष दिले पाहिजे
असेही त्यांनी स्पष्ट केले. महापालिकेच्या रुग्णालयांचे काम पूर्ण झाले आहे. परंतु अद्याप रुग्णालये सुरू केली जात नाहीत. शक्य तितक्या लवकर रुग्णालये सुरू करण्यात यावीत. नोकरभरतीला परवानगी मिळावी यासाठी स्वत: पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासनही त्यांनी दिले.
यावेळी विजय माने, शिवराम पाटील, एम. के. मढवी, रंगनाथ औटी, संजू वाडे, गणपत शेलार व
इतर पदाधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)