Join us

मराठी एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांना नोटीस जारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2025 07:30 IST

१३ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता मोर्चा

मुंबई : कबुतरखाना वादावरून बुधवारी आयोजित मोर्चाच्या पार्श्वभूमीवर दादर पोलिसांनी मराठी एकीकरण समितीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना नोटीस बजावली आहे. शहरात लागू असलेल्या पोलिस आयुक्तांच्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन होऊ नये, तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी ही नोटीस देण्यात आली आहे.

दादर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक ज्ञानेश्वर आवारी यांनी ही नोटीस जारी केली आहे. १३ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता हा मोर्चा काढण्यात येणार आहे. समितीचे अध्यक्ष गोवर्धन देशमुख यांनी नागरिकांनी या आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन केले आहे.

कबुतरांपासून होणाऱ्या आजाराबाबत मार्गदर्शन

'फ्रेंड्स ऑफ मुंबई' या सामाजिक-सांस्कृतिक संस्थेच्यावतीने गुरुवारी १४ ऑगस्टला दादरमध्ये 'कबुतरांना खाणे देणे योग्य की अयोग्य?' या विषयावर एक माहितीपर चित्रफीत आणि विषयातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन असा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे.

गुरुवारी सायंकाळी ब्राह्मण सेवा मंडळ सभागृहात हा कार्यक्रम होणार असून जे जे रुग्णालयाचे डॉ. दीपक भानुशाली, पशुतज्ज्ञ देवयांनी कायंदे हे मार्गदर्शन करतील, अशी माहिती संस्थेचे सभासद दिवाकर दळवी यांनी दिली. 

टॅग्स :मुंबईमुंबई पोलीस