Join us
Daily Top 2Weekly Top 5

एनआयएसह निर्दोष मुक्त झालेल्या ७ जणांना नोटीस; विशेष न्यायालयाचे आदेश रद्द करण्याची मागणी केली होती

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2025 06:43 IST

सात जणांना निर्दोष सोडण्याच्या विशेष न्यायालयाच्या निर्णयाला पीडितांच्या कुटुंबीयांनी न्यायालयात आव्हान दिले आहे.

मुंबई : विशेष न्यायालयाने २००८ मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी निर्दोष सोडलेल्या सात जणांना उच्च न्यायालयाने गुरुवारी नोटीस बजावली. त्यात एनआयएचाही समावेश आहे. स्फोटात मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांनी अपील दाखल केले आहे. मुख्य न्या. श्री चंद्रशेखर आणि न्या. गौतम अंखड यांच्या खंडपीठाने राष्ट्रीय तपास संस्थाआणि महाराष्ट्र सरकारलाही नोटीस बजावली आणि सहा आठवड्यांनी अपील सुनावणीसाठी ठेवले. सात जणांना निर्दोष सोडण्याच्या विशेष न्यायालयाच्या निर्णयाला पीडितांच्या कुटुंबीयांनी न्यायालयात आव्हान दिले आहे.

काय आहेत आक्षेप ?

निर्दोषमुक्त झालेल्या सात आरोपींमध्ये भाजपच्या माजी खासदार प्रज्ञासिंह ठाकूर आणि लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांचा समावेश आहे. दोषपूर्ण तपास किंवा तपासातील त्रुटी निर्दोष सुटकेचे समर्थन करू शकत नाहीत आणि कट गुप्तपणे रचण्यात आला होता. त्यामुळे थेट पुरावा मिळू शकत नाही, असे अपिलात म्हटले आहे. तसेच विशेष न्यायालयाचे आदेश रद्द करावे, अशी मागणी अपिलकर्त्यांनी केली आहे.

टॅग्स :न्यायालय