Join us  

खाटांची माहिती अपडेट न करणाऱ्या २२ नर्सिंग होम, रुग्णालयांना नोटीस

By ऑनलाइन लोकमत | Published: October 01, 2020 8:44 PM

संबंधित रुग्णालयातून डॅशबोर्डवर अपडेट माहिती देण्यात येईल, याची खात्री करण्याची जबाबदारी स्थानिक सहाय्यक आयुक्त आणि वैद्यकीय अधिकारी यांच्यावर असणार आहे. 

मुंबई - रुग्णालयात उपलब्ध खाटांची माहिती नियमित पालिकेच्या संगणकीय डॅशबोर्डवर अपडेट न करणाऱ्या २२ नर्सिंग होम्स आणि रुग्णालयांना महापालिकेने नोटीस बजावली आहे. तसेच संबंधित रुग्णालयातून डॅशबोर्डवर अपडेट माहिती देण्यात येईल, याची खात्री करण्याची जबाबदारी स्थानिक सहाय्यक आयुक्त आणि वैद्यकीय अधिकारी यांच्यावर असणार आहे. 

खाजगी रुग्णालयांमधील उपलब्ध खाटांचे योग्य नियोजन करण्यासाठी महापालिकेने मे महिन्यात संगणकीय डॅशबोर्ड तयार केला आहे. यावर मुंबईतील ३३ मोठ्या रुग्णालयांकडून नियमित खाटांची माहिती दिली जाते. मात्र छोटे नर्सिंग होम व रुग्णालय वेळेवर माहिती देत नसल्याने प्रतयक्ष पालिकेने बाधित रुग्ण पाठविल्यानंतर संबंधित रुग्णालयातील खाटेवर आधीच रुग्ण दाखल केल्याचे आढळून आले आहे. यामुळे खाटांचे नियोजन बिघडत असून खाटांचा अनावश्यक तुटवडा जाणवत आहे. 

याची गंभीर दखल घेऊन महापालिकेने २२ नर्सिंग होम, रुग्णालयांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. यामध्ये निरलॉन रुग्णालय, बोरवलीचे अपेक्स रुग्णालय, बालाजी, लाईफ लाईन या रुग्णालयाचा समावेश आहे. सर्व रुग्णालयांमधील खाटांचे नियोजन पालिकेच्या विभाग स्तरावरील वॉर रूम मार्फतच केले जात आहे. कोविड रुग्णांवर उपचार करण्याची परवानगी दिलेल्या कोणत्याही रुग्णालयाला थेट रुग्ण दाखल करून घेता येणार नाही, असे पालिकेने यापूर्वीच स्पष्ट केले आहे. 

रिक्त खाटांची माहिती अपडेट न करणाऱ्या नर्सिंग होम आणि रुग्णालयांना कारणे दाखवा नोटीस पाठवली आहे. काही नर्सिंग होम उशिरा माहिती अपडेट करीत असतात. त्यांना समज देण्यात आली आहे. मात्र ही नोटीस म्हणजे त्यांना केवळ चेतावनी असून त्यांच्यावर अंकुश रहावा यासाठी आहे. त्या - त्या विभागातील सहाय्यक आयुक्त आणि वैद्यकीय अधिकारी अशा रुग्णालयांवर यापुढे लक्ष ठेवतील, जेणेकरून खाटेअभावी रुग्णांची गैरसोय होणार नाही. - सुरेश काकाणी (अतिरिक्त महापालिका आयुक्त)  

टॅग्स :कोरोना वायरस बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरस