Join us  

'ही नाइटलाइफ नाही तर किलिंग लाइफ', भाजपाची राज्य सरकारवर टीका 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2020 4:29 PM

'मुंबईच्या नाइट लाइफला रक्तरंजित इतिहास आहे'

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या नाइटलाइफच्या निर्णयाला राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता येत्या 27 जानेवारीपासून मुंबईत नाइटलाइफ प्रत्यक्षात लागू  होणार आहे. मात्र, राज्य सरकारच्या या नाइट लाइफच्या निर्णयाला भाजपाने विरोध दर्शविला आहे. नाइटलाइफ नाही तर किलिंग लाइफ असल्याचे सांगत भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे.  

ही नाइटलाइफ नसून किलिंग लाइफ आहे. मुंबईतील कमला मिल येथे आग लागली होती. त्यामध्ये 14 जणांचा मृत्यू झाला. मुंबईच्या नाइटलाइफला रक्तरंजित इतिहास आहे, हे निर्णय घेणाऱ्यांना माहिती नाही का?' असा सवाल करत आशिष शेलार यांनी सरकारच्या नाइट लाइफ निर्णयावर जोरदार टीका केली आहे.

याचबरोबर, मोठ्या भ्रष्टाचाराची सुरूवात नाइटलाइफच्या माध्यमातून होईल. कमला मिल आग लागली होती. अतिरिक्त एफएसआय घोटाळा झाला. हा भ्रष्टाचार पाठीशी घालण्यासाठी नाइट लाइफचा निर्णय घेऊन टुरिझमच्या नावाखाली पडदा टाकण्याचे काम सत्ताधारी महापालिका आणि सरकार करत आहे, असा घणाघाती आरोप आशिष शेलार यांनी केला आहे.

दरम्यान, मुंबईत नाइटलाइफला राज्य सरकारकडून तत्वत: मंजुरी देण्यात आली आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी याबाबतची घोषणा केली आहे. 'पब आणि बारसाठी नवे नियम करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे पब आणि बार हे आधीप्रमाणेच रात्री दीड वाजेपर्यंतच सुरू राहतील,' असे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंनी स्पष्ट केले आहे. 

दिवाळी आणि गणपतीच्या सणांच्या वेळी आपण रात्रभर फिरत असतो. नाइटलाइफ सुरू केल्याने अनेक जण तीन शिफ्टमध्ये काम करतील. महसुलाबरोबरच नोकऱ्यांमध्येही वाढ होणार आहे. आतापर्यंत पोलीसवाले दीड वाजेपर्यंत दुकाने खुली आहेत की बंद याचा आढावा घेत फिरत होते. त्या जबाबदारीतून त्यांना मुक्त करायचे असून, त्यांना खरे पोलिसांचे काम करायला देणार आहे, असेही आदित्य ठाकरे यांनी म्हटले. 

जर कोणत्याही मॉल किंवा कंपनीला वाटले खासगी सुरक्षा द्यावी, तर तीसुद्धा आम्ही पुरवणार आहोत. उत्पादन शुल्काचे कायदे बदललेले नाहीत. सर्व अभ्यास करूनच हा प्रस्ताव मांडला असून, तो कार्यान्वित होणार आहे. नरिमन पॉइंट, काळा घोडा, वांद्रे-कुर्ला संकुल अशा अनिवासी क्षेत्रातून याची सुरुवात होणार असून, या भागातील मॉल, दुकाने, हॉटेल्स 24 तास खुली ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. नाइटलाइफसाठी सुरक्षेच्या उपाययोजना करण्यात येणार असून, उपक्रमाचे यश पाहून व्याप्ती वाढविण्यात येणार असल्याचेही आदित्य ठाकरेंनी सांगितले. 

(नाइटलाइफच्या निर्णयाला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी, 26 जानेवारीपासून होणार अंमलबजावणी)

(ठाकरे मंत्रिमंडळानं घेतले सहा मोठे निर्णय, आता नगरसेवकांमधून होणार नगराध्यक्षाची निवड)

(पुण्यात नाईट लाईफ सुरू होणार का? आदित्य ठाकरेंचा पुणेकरांना चिमटा)

टॅग्स :आशीष शेलारनाईटलाईफ